राज्यसभेचे 12 खासदार निलंबित; शिवसेनेचे अनिल देसाई,  प्रियांका चतुर्वेदींचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत संसदेत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्क गोंधळावरुन राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या 12 खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेनेच्या अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह कॉँग्रेस, तृणमूल कॉँग्रेस, सीपीआय आणि सीपीएम खासदारांचा समावेश आहे.

पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळावरून विरोधी पक्षाच्या 12 सदस्यांवर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निलंबनाची कारवाई करण्यात आली. राज्यसभेच्या सभापतींची अवहेलना, सभागृहाच्या नियमांचा सतत गैरवापर करून गैरवर्तन करणे, हिंसक कृतींद्वारे सभागृहामध्ये गैरवर्तवणूक करुन कामकाजामध्ये अडथळा आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात येत असल्याच निलंबन नोटीसीमध्ये म्हटलं आहे. संसदेत इतरांसाठी आवाज उठवणाऱयांचा आवाज दाबला जात असेल तर तो लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा आहे.

मल्लाकार्जुन खरगे,विरोधी पक्षनेते राज्यसभा

आपल्या देशात आरोपीलाही बाजू मांडण्याचा हक्क आहे. जिल्हा कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्याच्यासाठी वकील उपलब्ध करून दिला जातो. एकीकडे आरोपीला असे अधिकार असताना आम्हाला मात्र ती संधीही दिली गेली नाही. आमची बाजू न ऐकताच कारकाई करण्यात आली.

खा. प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना

विरोधी सदस्यांची आज बैठक

या कारवाईचा सर्व विरोधी सदस्य निषेध करत असल्याचे संयुक्त निवेदन काढत विरोधकांनी म्हटले आहे. तसेच अधिवेशनातील पुढील रणनीती ठरविण्यासंदर्भात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात मंगळवारी बैठक घेण्यात येणार आहे.

पावसाळी अधिवेशनात  काय घडलं होतं संसदेत

11 ऑगस्टला विमा विधेयकावर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. त्यादरम्यान या खासदारांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर कागदपत्रे फेकली आणि काही सदस्य सभागृहातील कर्मचाऱयांसमोर ठेवलेल्या टेबलावर चढले. प्रकरण शांत करण्यासाठी मार्शल्सना बोलवण्याची वेळ आली होती. सभागृहात घडलेल्या घटनांमुळे लोकशाहीचं मंदिर अपवित्र झाल्याचं राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंनी म्हटलं होतं.

यांच्यावर झाली कारवाई

शिवसेना – अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी.

कॉँग्रेस – फुलो देकी नेताम, छाया कर्मा, रिपुन बोरा, राजमणी पटेल,  सय्यद नासिर हुसेन, अखिलेश प्रसाद सिंग.

तृणमूल कॉँग्रेस- डोला सेन, शांता छेत्री.

सीपीएम – एल्लामारम करीम

सीपीआय – बिनोय किश्मक