पाणी मागायला आलेल्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून, उत्तर प्रदेश पुन्हा हादरले

उत्तर प्रदेशमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेश पुन्हा हादरले आहे.

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात 25 फेब्रुवारी रोजी एक 12 वर्षाची मुलगी शेतात आपल्या कुटुंबीयांसोबत जेवत होती. तेव्हा तिला तहान लागली. ती पाणी पिण्यासाठी जवळच असलेल्या हरेंद्रच्या घरी गेली. नराधम हरेंद्रने या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. तसेच तिचा मृतदेह घरातच पुरला. मुलगी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला. ती न सापडल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी तपास सुरू केल्यावर हरेंद्र फरार झाला होता. पोलिसांनी हरेंद्रच्या घरची झडती घेतल्यानंतर त्याच्या घरात एक खोल खड्डा आढळला. माती उपसल्यानंतर पीडित मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला. पोलिसांनी तत्काळ आपली सुत्रे हलवली आणि आरोपी हरेंद्रला हिमाचल प्रदेशमधून अटक केली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.

2020 मध्ये उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची जीभ कापून तिला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर उपचारादरम्यान पीडित मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात रोष निर्माण झाला होता. आता या घटनेमुळे पुन्हा उत्तर प्रदेश हादरले असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या