
मध्य रेल्वेच्या कल्याण ते सीएसएमटी मुख्य मार्गावर वातानुकूलित लोकलचा गारगार प्रवास आजपासून सुरू झाला खरा, परंतु पहिल्याच दिवशी जवळपास 5,964 प्रवासी क्षमता असलेल्या एसी लोकलमध्ये रात्री सवाआठपर्यंत केवळ 120 प्रवाशांनी प्रवास केल्याची आकडेवारी उघडकीस आली आहे. लॉकडाऊनचा काळ असल्याने सर्वसामान्यांना प्रवासावर बंदी अन् त्यात ऐन थंडीत एसीचा गारेगार प्रवास प्रवाशांना लोकलकडे आकर्षित करू शकला नसल्याचे म्हटले जात आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण ते सीएसएमटी सेक्शनमध्ये एसी लोकलच्या दहा फेऱयांनी आजपासून गारेगार सेवेचा शुभारंभ करण्यात आला. परंतु रात्री सवाआठपर्यंत एसी लोकलमधून 120 प्रवाशांनी प्रवास केला असून त्याद्वारे मध्य रेल्वेला 7,695 रुपयांची कमाई झाली आहे. 20 प्रवासी तिकिटातून 3,425 रुपयांची तर 100 सिझन पासाच्या विक्रीतून 4,270 रुपयांची अशी 7,695 रुपयांची मध्य रेल्वेला कमाई झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये एका लोकलमध्ये 700 प्रवाशांना प्रवासाची परवानगी असताना रात्री 8 पर्यंत झालेल्या सात फेऱया मिळून अवघे 120 प्रवासी लाभले आहेत.
कन्फर्म तिकिटावर लोकलचे सिंगल जर्नी तिकीट मिळणार
सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसल्याने लांब पल्ल्यांच्या गाडय़ा पकडणाऱया प्रवाशांना किंवा उतरणाऱया प्रवाशांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळे राज्य सरकारच्या विनंतीवरून अशा लांब पल्ल्याच्या प्रवाशांना एकेरी तिकीट काढून लोकलमधून प्रवास करण्याची मुभा रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
लांब पल्ल्यांच्या प्रवाशांना मेल-एक्प्रेस सुटणाऱया टर्मिनसपर्यंत किंवा बाहेरगावाहून अशा ट्रेनमधून येणाऱयांना मुंबईत त्यांच्या घरापर्यंत लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला केली होती. त्यावर रेल्वे मंत्रालयाने काही अटींवर अशी मंजुरी लांब पल्ल्यांच्या प्रवाशांना दिली असल्याने त्यांच्या टॅक्सी किंवा रिक्षा शोधण्याचा त्रास वाचणार आहे.
ज्या प्रवाशांकडे लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे कन्फर्म तिकीट असेल त्यांना ट्रेन सुटण्याच्या सहा तास आधी मुंबई आणि उपनगरातील राहण्याच्या ठिकाणापासून ते टर्मिनसपर्यंतचे एकेरी प्रवासाचे लोकलचे तिकीट खरेदी करून प्रवास करता येईल.
तसेच बाहेरगावच्या ट्रेनने मुंबईत उतरणाऱया प्रवाशांनाही ट्रेन येण्याच्या वेळेनंतर सहा तासांपर्यंत एकेरी प्रवासांचे तिकीट खरेदी करून मुंबई तसेच उपनगरात घराजवळील स्थानकापर्यंत लोकलने प्रवास करता येणार असल्याची माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्तरीत्या जारी केलेल्या पत्रकात दिली आहे.






























































