उल्हासनगरात बेरोजगारीचे विदारक चित्र, उद्यान अधीक्षकाच्या एका जागेसाठी १२३ उमेदवार

सरकारी नोकऱ्यांची क्रेझ आजही कायम असल्याचे चित्र उल्हासनगर महापालिकेत पहायला मिळाले. उल्हासनगर पालिकेतील उद्यान अधीक्षक पदाच्या कॉण्ट्रक्टवरील केवळ एका जागेसाठी तब्बल १२३ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये दोन पीएचडी आणि बहुतांश अॅग्रीकल्चरल पदवीधरांचा समावेश असल्याने बेरोजगारीचे विदारक चित्र समोर आले आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेत उद्यान अधीक्षक पदाची एक जागा रिक्त असून त्यासाठी अर्ज मागवले होते. एका जागेसाठी राज्यभरातून १२३ उमेदवारांनी अर्ज केले होते. पालिका मुख्यालयात यासाठी आज मुलाखती घेण्यात आल्या. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक अभिजित पिसाळ, जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, वरिष्ठ लिपिक सतीश राठोड यांचा उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. आता सर्वांचे लक्ष एकमेव पात्र भाग्यवान उमेदवाराच्या नियुक्तीकडे लागले आहे.

कॉण्ट्रॅक्टवर का असेना पण घ्या !

नोकरीची नितांत गरज असल्याने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले पदवीधर मोठ्या संख्येने आले होते. यामध्ये बहुतांश एमएससी अॅग्रीकल्चरल, बीएससी अॅग्रीकल्चरल उमेदवार होते. शिवाय दोन पीएचडीधारक होते. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांची संख्या बघून मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर अवाक् होण्याची वेळ आली. कॉण्ट्रॅक्टवर का असेना पण घ्या, असे साकडेच उमेदवार मुलाखत घेणाऱ्या पॅनलला घालत होते.