राज्यात 1284 चारा छावण्या सुरू; मोबाईल ऍपद्वारे शेतीपयोगी जनावरांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील नगर, बीड, धाराशीव, लातूर, संभाजीनगर, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिह्यांमध्ये 1284 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान-मोठे मिळून 8 लाख 55 हजार 513 जनावरे आहेत. या जनावरांच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी अँड्रॉइड प्रणालीवरील ऍप विकसित करण्यात आले असून त्याचा वापर करण्याचे निर्देश छावण्यांना देण्यात आले आहेत.

राज्यातील छावण्यांमधील पशुधनाच्या आहारामध्येही वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चारा छावण्यांमध्ये दाखल मोठय़ा जनावरांना यापूर्वी 15 किलोग्रॅम हिरवा चारा, उसाचे वाडे, ऊस दिला जात होता. आता मोठय़ा जनावरांना दैनंदिन 18 किलो हिरवा चारा, उसाचे वाडे किंवा ऊस दिला जाईल. त्याचबरोबर लहान जनावरांना यापूर्वी 7.5 किलो हिरवा चारा, उसाचे वाडे किंवा ऊस दिला जात होता. आता त्यात वाढ करून 9 किलो दैनंदिन चारा दिला जाईल.  सध्या राज्यातील या छावण्यांमध्ये 8 लाख 55 हजार 513 जनावरे दाखल आहेत. या सर्व छावण्यांमधील दाखल जनावरांपैकी मोठय़ा जनावरांसाठी प्रतिदिन 90 रुपये, तर लहान जनावरांसाठी प्रतिदिन 45 रुपये याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन निधीमधून महसूल व वन विभागाकडून 10 कोटी निधी राहत व चारा शिबिरांकरिता प्राप्त झाला आहे.

दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला आणखी 2160 कोटींची मदत

राज्याच्या दुष्काळी भागातील जनतेला मंगळवारी केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. केंद्र सरकारने महाराष्ट्राला दुष्काळ निवारणासाठी 2 हजार 160 कोटींची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती जाहीर केली. या मदतीबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी 2160 कोटी रुपये मदतीपोटी प्राप्त झाले. आतापर्यंत केंद्राने राज्याला 4248.59 कोटी रुपये दिले आहेत.

जनावरांना बारकोड

दुष्काळी भागात शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमधील पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी छावणीमधील जनावरांना बारकोड असलेले टॅग लावण्यात येणार आहेत. चारा छावण्यांमधील पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीच्या नोंदीसाठी कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टिम (Cattle Camp Management System) ही प्रणाली विकसित करण्यात आली असून ती छावणी चालकांना व्यवस्थापनासाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऍपमध्ये छावणी चालकाला प्रथम छावणीतील पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर बारकोड असलेले टॅग जनावरांच्या कानात लावावे लागणार आहे. छावणीतील जनावरांची दिवसातून एकदा संख्या मोजावी लागणार असून त्यासाठी बारकोड स्कॅन करावे लागणार आहे. बारकोड लावणे, ऍपमध्ये जनावरांची व छावणीची माहिती अपलोड करणे यासंबंधीचे प्रशिक्षण छावणी चालकांना देण्यात येणार आहे.