गणपती अकरा दिवस; क्वारंटाइन चौदा दिवस, रायगड जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

1692

‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर  करत रायगडात गणपतीसाठी गावी जाण्याची तयारी करत असाल तर चाकरमान्यांनो आताच बॅगा भरायला सुरुवात करा. गणेशोत्सव 22 दिवसांवर असला तरी 7 ऑगस्टपर्यंतच चाकरमान्यांना त्यांचे गाव गाठावे लागणार आहे. त्यानंतर 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतरच ‘श्री’चे दर्शन घेता येणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर  कोरोनाचे मोठे विघ्न आल्याने रायगड जिल्हाधिकार्‍यांनी या संदर्भात सूचना जारी केल्या असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे.

कोकणातील गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा अद्भुत सोहळा असतो. घराघरांत श्रींचे आगमन होत असल्याने दरवर्षी कामावर हक्काची सुट्टी घेऊन लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात आपले गाव गाठतात. यंदा गाव कसे गाठायचे? गावाला कधी पोहोचायचे? या विचारात असलेल्या रायगडातील चाकरमान्यांसाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या आहेत. त्यानुसार रायगडात गणपतीसाठी गावी येणार्‍या चाकरमान्यांना 7 ऑगस्टपर्यंतची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

देणगीची जबरदस्ती केल्यास फौजदारी गुन्हा

घरोघरी देणगी मागण्यास मनाई करण्यात आली आहे. कुणी स्वेच्छेने   देणगी दिल्यास ती स्वीकारण्याची मुभा आहे. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. नियम मोडणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या