डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमावरून परतताना पिकअप झाला पलटी, 14 जणांचा जागीच मृत्यू

मध्य प्रदेशमधील डिंडोरी येथे भीषण अपघात झाला आहे. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमावरून परतत असताना खचाखच भरलेले पिकअप वाहन पलटी झाले. बिच्छिया पोलीस ठाण्याच्या येणाऱ्या बडझर घाटामध्ये झालेल्या अपघातामध्ये 14 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 21 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 6 पुरुषांचा आणि 8 महिलांचा समावेश आहे. जखमींवर शाहपुराच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमाही देवरी गावचे लोकं मंडला जिल्ह्यातील मसुरी घुघरी गावामध्ये डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. पीकअप वाहन क्र. (एमपी 20, जीबी 4146) मधून सर्वजण माघारी येत असताना च्छिया पोलीस ठाण्याच्या येणाऱ्या बडझर घाटामध्ये वाहनाचे ब्रेक फेल. त्यामुळे चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या उतारावरून खाली जात पलटी झाले. हा अपघात झाला तेव्हा पिकअप वाहनातून जवळपास 45 लोकं प्रवास करत होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर 21 जखमींवर शाहपुरा सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दोघांची तब्येत अत्यस्वस्थ असून त्यांना जबलपूरला रेफर करण्यात आले आहे.

4 लाखांची मदत जाहीर

दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी डिंडोरी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच सरकारच्या वतिने मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे.


मोदींनी व्यक्त केला शोक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डिंडोरी अपघातावर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांप्रति संवेदाना व्यक्त केल्या.