
शादी डॉट कॉमवरून झालेली ओळख तरुणीला महागात पडली आहे. लग्न करण्याच्या आमिषाने तरूणाने तरूणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच तरूणीच्या नावावर 14 लाखांचे कर्ज घेत फसवणूक केली आहे. ही घटना 29 जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत घडली. शांतनु गंगाधर महाजन (वय 28, रिव्हरडेल सोसायटी, खराडी) याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 29 वर्षांच्या तरुणीने तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार तरुणीने विवाहासाठी शादी डॉटकॉमवर नोंदणी केली होती. त्याद्वारे तिची शांतनु याच्यासोबत ओळख झाली. ओळखीनंतर शांतनुने तरुणीशी संपर्क वाढवित तिला भेटण्यासाठी बोलाविले. हॉटेलात नेत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. आरोपीने तरुणीची नजर चुकवून तिचा मोबाईल घेतला. त्यामधील मेलआयडीवर स्वतःचा मोबाइल क्रमांक नोंदवित तिच्या नावावर 14 लाखांचे कर्ज घेतले. कर्जाची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात जमा करत त्याने तरूणीची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात येताच तरुणीने पोलीसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.


























































