औंधमध्ये ऑक्सिजन यंत्रणेत बिघाड; 15 रुग्णांना तातडीने हलविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औंध ग्रामीण रुग्णालयातील कोरोना सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा विभागात मंगळवारी रात्री अचानक बिघाड झाल्याने खळबळ उडाली. मात्र, तहसीलदार किरण जमदाडे आणि डॉक्टरांनी तातडीने येथील 15 रुग्णांना वडूज व मायणी येथे हलविल्यामुळे मोठा धोका टळला, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास साळुंखे यांनी दिली.

औंध येथील ग्रामीण रुग्णालयात 30 बेडचे कोरोना सेंटर आहे. येथे औंधसह खटाव तालुक्यातील रुग्ण दाखल आहेत. येथील रुग्णांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील दीड महिन्यापासून कोरोना सेंटर सुरळीत सुरू आहे. मात्र, मंगळवारी रात्री रुग्णांच्या नातेवाईकांसह प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. रात्री उशिरा येथील ऑक्सिजन पुरवठा करणाऱया यंत्रणेत बिघाड झाल्याने खळबळ उडाली. येथे 40 ते 65 वयोगटातील 15 रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू नये, यासाठी तातडीने त्यांना वडूज व मायणी येथे हलविण्यात आले. यामध्ये दहा रुग्णांवर वडूज, तर पाच रुग्णांवर मायणी येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेची दखल घेऊन तहसीलदार किरण जमदाडे यांनी तातडीने ऑक्सिजन यंत्रणेची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी पहाटे दोन वाजेपासून येथील ऑक्सिजन सिलिंडर, पाईपलाईन दुरुस्ती तसेच रुग्णालयातील प्रत्येक बेडला जोडलेल्या ऑक्सिजन यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.

तहसीलदार किरण जमदाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. माने,  डॉ. संतोष मोरे, डॉ. सम्राट भादुले व वैद्यकीय पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असे डॉ. विलास साळुंखे यांनी सांगितले.

औंध ग्रामीण रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याचे समजताच तातडीने 15 रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले. यापुढे खटाव तालुक्यातील शासकीय, खासगी रुग्णालयात अशी समस्या निर्माण होऊ नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित आस्थापनांना देण्यात आल्या आहेत. – किरण जमदाडे, तहसीलदार खटाव