
नगर अर्बन मल्टिस्टेट शेडय़ुल्ड बँकेच्या 150 कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सचिन गायकवाड (रा. कौडगाव, ता. श्रीगोंदा) याच्याकडे सुरू असलेल्या तपासादरम्यान कर्जाच्या रकमेतील व्यवहारांच्या महत्त्वाच्या नोंदी समोर आल्या आहेत. संचालकांशी संबंधित जवळच्या व्यक्तींची कर्जप्रकरणे मिटविण्यासाठी अथवा ‘एनपीए’तून बाहेर काढण्यासाठी दुसरे कर्ज करून त्या रकमा संबंधित कर्ज खात्यामध्ये वळविल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने थेट आरबीआयकडून बँकेशी संबंधित सर्व अहवाल प्राप्त करून घेतल्यामुळे बँकेतील गैरव्यवहाराचा संपूर्ण लेखाजोखा पोलिसांच्या हाती आला आहे. त्यामुळे तत्कालीन व सध्याच्या संचालकांचे धाबे दणाणले आहे.
बँकेच्या 28 संशयास्पद कर्ज खात्यांसह बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या जवळचे कार्यकर्ते असलेल्या सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची दीडशे कोटींची फसवणूक केल्याची तक्रार नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी पोलिसांत दिल्याने कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड करीत आहेत.
पोलिसांनी आरोपी सचिन गायकवाडशी संबंधित ‘घृष्णेश्वर मिल्क’ व ‘जिजाऊ मिल्क प्रॉडक्शन’ या कंपन्यांच्या कर्ज खात्याची व बँक खात्याची तपासणी सुरू केली आहे. कर्ज घेतलेल्या रकमेचा विनियोग इतर कारणांसाठी झाल्याचे यात समोर आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. काही रकमा इतर कर्ज खात्यांमध्ये वळविल्या आहेत. त्यामुळे संबंधित कर्ज खातेदार, संचालकांच्या जवळच्या काही व्यक्ती व काही संचालकही पोलिसांच्या रडारवर आहेत. बनावट व्हॅल्युएशन रिपोर्टसंदर्भातही पोलिसांकडून तपास सुरू आहे. यातही काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
कर्जाच्या रकमेचा गैरवापर झाल्याचे बँकेतील व्यवहारांमधून समोर येत असल्याने या रकमा कोणाकडे वळविल्या गेल्या? या सर्व प्रकारांमध्ये कोणाची साथ होती? यात संचालक व अधिकाऱयांचा समावेश आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 20 जूनपर्यंत आरोपी गायकवाड यांना पोलीस कोठडी असल्यामुळे तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. आरोपी गायकवाडकडून मिळालेल्या माहितीनुसार व बँकेच्या अहवालामधील व्यवहारांच्या नोंदीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला आहे.





























































