गुंतवणुकीच्या अमिषाने पायलटला 16 लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यवसायात गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने पायलटला तब्बल 16 लाख 62 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. जून ते जुलै 2021 या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणी आकाश दिप सिंधु (वय 47, रा.मोहम्मदवाडी) यांनी पोलीसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाईलधारक, बँक खातेधारकाविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश हे पायलट असून त्यांना व्यवसायात गुंतवणूक करायची होती. त्यासाठी ते ऑनलाईनरित्या माहिती घेत असताना एकाने त्यांचा विश्वास संपादित केला. यावेळी आरोपीने आकाश यांना स्टोन.इमिको.क्लब या वेब अ‍ॅड्रेसमध्ये ते रेड वाईन बनविण्याकरिता आवश्यक असणारे स्पाईस ट्रेडिंगचा व्यवसाय करत असल्याची बतावणी केली. त्यांची साखळी संपूर्ण देशभरात पसरलेली असून गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे अमिष त्याने आकाश यांना दाखवले. आरोपींनी ऑनलाईन खोटी माहिती सादर करुन आकाश यांना विविध खात्यांवर रक्कम भरण्यास भाग पाडून एकूण 16 लाख 62 हजार रुपयांची फसवणुक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करत आहेत.