
राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 16 हजार 767 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी दिवसभरात 11 हजार 541 जण कोरोनामुक्त झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.58 टक्क्यांवर पोहचले आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण 40 लाख 10 हजार 200 चाचणी पूर्ण करण्यात आल्या असून त्यापैकी 19.05 टक्के म्हणजेच 7 लाख 64 हजार 281 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज राज्यात कोरोनामुळे 328 जणांचा मृत्यू झाल्याचे देखील आरोग्य विभागाने यावेळी जाहीर केले आहे.
मुंबईत दिवसभरात 1,432 कोरोना रुग्ण
मुंबईत आज दिवसभरात 1,432 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 682 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 1 लाख 15,500 वर पोहोचली आहे.
देशात 24 तासांत 76 हजार रुग्ण
हिंदुस्थानात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चालला आहे. गेल्या 24 तासांत देशात 76 हजार 472 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून आतापर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 34 लाखांच्या पार गेला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.




























































