
संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, विविध विषय मांडून अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारणाऱ्या 17 खासदारांची ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. दोन संसदीय स्थायी समित्यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
संसदेत सक्रिय सहभाग, प्रश्न विचारणे आणि कायदेविषयक कामात योगदान या आधारावर संसदरत्न पुरस्कार दिले जातात. हा पुरस्कार प्राइम पॉइंट फाऊंडेशनने सुरू केला. यंदाच्या विजेत्यांची निवड राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली. लोकशाही बळकट करण्यासाठी संसदेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या खासदारांना हे पुरस्कार दिले जातात. 17 खासदारांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आला असून त्यात महाराष्ट्रातील 7 खासदारांचा समावेश असल्याचे हंसराज अहिर म्हणाले.
या खासदारांचाही समावेश
भाजपच्या स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, प्रवीण पटेल, रवी किशन, निशिकांत दुबे, विद्युत बरन महतो, पी. पी. चौधरी, मदन राठोड, दिलीप सैकिया, द्रमुकचे सी. एन. अण्णादुराई या खासदारांनाही संसदरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.