नगरमध्ये यंदा 18 टीएमसी अधिक पाणीसाठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारदरा, निळवंडे, मुळा व आढळा या चार प्रकल्पांमध्ये मिळून गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 28 हजार 692 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. यंदा मात्र या प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे. सध्या हे प्रकल्प शंभर टक्के भरले असून या चारही प्रकल्पांमध्ये मिळून 46 हजार 419 दशलक्ष घनफूट म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 18 टीएमसी अधिक पाणीसाठा आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरी अवघा 70 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे प्रमुख धरणे शंभर टक्के भरली नव्हती. त्यातच समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नोव्हेंबर 2018 मध्ये जायकवाडी धरणासाठी भंडारदरा, निळवंडे आणि मुळा या धरणामधून पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये या तिन्ही धरणामधील पाणीसाठा झपाट्याने खाली आला होता. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार 10 नोव्हेंबर 2018 ला भंडारदरा धरणामध्ये 5 हजार 513 दशलक्ष घनफूट (50 टक्के), निळवंडे धरणामध्ये 6 हजार 325 दशलक्ष घनफूट (79 टक्के) व मुळा धरणामध्ये 16 हजार 23 दशलक्ष घनफूट (61 टक्के) पाणीसाठा होता. तर, 1 हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमता असणार्‍या आढळा प्रकल्पामध्ये मागील वर्षी 10 नोव्हेंबरला 557 दशलक्ष घनफूट (52 टक्के) पाणीसाठा होता. उन्हाळ्यामध्ये तर या प्रमुख प्रकल्पांमधील पाणीसाठा तळाला गेला होता. यंदा मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील दुसर्‍या आठवडा संपला असला तरी भंडारदरा, निळवंडे, मुळा व आढळा या चारही प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा आहे.

मुळा धरणातून विसर्ग सुरू

जिल्ह्यातून वाहणार्‍या प्रवरा, गोदावरी, भीमा, घोड व मुळा या पाच नद्यांमध्ये विविध प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार रविवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजता मुळा धरणातून मुळा नदीमध्ये सातशे क्युसेक वेगाने, प्रवरा नदीत ओझर बंधारा येथून 457 क्युसेक वेगाने, गोदावरी नदीत नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून 2 हजार 421 क्युसेक वेगाने, भीमा नदीत दौंडपूल येथून 3 हजार 885 क्युसेक वेगाने, घोड नदीत घोड धरणातून 1 हजार 200 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता.