
कोल्हापूर आणि साताऱ्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सांगलीतही रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. बुधवारी एका दिवसात 19 रुग्ण आढळून आले. कारागृहातील कैद्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. वाळवा तालुक्यात सर्वाधिक 10 रुग्ण आढळले आहेत.
राज्यातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सांगली जिल्ह्यात बदलते वातावरण आणि साथीचे आजार वाढले होते. त्यातच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल नव्याने 19 रुग्ण आढळून आले. त्यामध्ये वाळवा तालुक्यात सर्वाधिक 10 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. कारागृहातील कैदी कोरोनाबाधित आढळल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या कैद्याच्या संपर्कात असलेल्यांची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे.
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये आटपाडी व तासगाव तालुक्यांत प्रत्येकी तीन, खानापूर दोन, तर शिराळा तालुक्यासह परराज्यातील प्रत्येकी एक रुग्ण आढळला. दोनजणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्ह्यात 48 बाधित रुग्ण असून, सात रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील पाचजणांची प्रकृती चिंताजनक आहे.
सोलापुरात आढळले सहा रुग्ण
जिल्ह्यात आज सहा रुग्ण आढळून आले असून, नऊजण बरे झाले आहेत, तर 60 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आज 57 चाचण्या करण्यत आल्या. यात चार रुग्ण आढळले असून, चारजण बरे झाले आहेत, तर 40 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात 44 चाचण्या करण्यात आल्या असून, दोन रुग्ण आढळले आहेत. पाच रुग्ण बरे झाले असून, 20 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


























































