
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झपाटय़ाने वाढणारी रुग्णसंख्या आता वेगाने कमी होत असून गेल्या एकाच महिन्यात सवादोन लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 5 एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध आणि 23 एप्रिलपासून निर्बंधांची आणखी कठोर अंमलबजावणी चांगलीच परिणामकारक ठरली आहे. 4 एप्रिल ते 4 मे कालावधीत मुंबईत 2,08,975 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असले तरी तब्बल 2 लाख 23 हजार 254 जण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 14 हजार 279 ने जास्त आहे. त्यामुळे मुंबईत सद्यस्थितीत कोरोनाचा ‘कहर’ कमी झाल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिकेने वर्षभर केलेल्या उपाययोजनांमुळे जानेवारीपासूनच रुग्णसंख्या चांगलीच कमी होत गेली. जानेवारीअखेर थेट 334 पर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या नोंद झाली होती. मात्र फेब्रुवारीच्या मध्यावर कोरोनाच्या दुसऱया लाटेत दैनंदिन रुग्णसंख्येने 10 हजारांचा टप्पा ओलांडल्याने पालिकेसह राज्य सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. त्यामुळे राज्य सरकारने मुंबईसह राज्यभरात 5 एप्रिलपासून दिवसा जमावबंदी, रात्रीची संचारबंदी आणि शनिवार-रविवार पूर्ण लॉकडाऊन आणि पालिकेनेही कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी तातडीने संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत केल्याने आता चांगले परिणाम दिसू लागले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट परतीच्या वाटेवर
कोरोनाच्या दुसऱया लाटेत वेगाने प्रसार होणाऱया विषाणूच्या नव्या स्टेनमुळे रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढली. एप्रिलच्या सुरुवातीला सुमारे 44 हजार ते 50 हजार चाचण्यांच्या प्रमाणात 20-21 टक्के असणारे पॉझिटिव्हिटी प्रमाण एप्रिलअखेर थेट 9 ते 10 टक्क्यांवर खाली आले. हे प्रमाण आता आणखी कमी कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आता परतीच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट होत आहे.

































































