लोकलमध्ये ब्लॅक बॉक्स! रेल्वे बजेटमध्ये 2.3 कोटी रुपये मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या इंजिन ड्रायव्हरच्या कॅबमध्ये क्रू व्हॉइस ऍण्ड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टम (सीव्हीव्हीआरएस) बसविण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात 2.3 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या सीव्हीव्हीआरएस यंत्रणेमुळे आणीबाणीच्या प्रसंगी मोटरमनच्या कॅबमधील सर्व घटना रेकॉर्ड होण्यास तर मदत होणार आहेच, शिवाय ट्रेनसमोरच्या कॅमेऱयांमुळे अपघातातील तपशील जतन करणे सोपे होणार आहे. लांब पल्ल्यांच्या इंजिनासह उपनगरीय लोकलच्या मोटरमन व गार्डच्या कॅबमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

मुंबई उपनगरीय लोकलची वाहतूक करण्याचे काम मोटरमन डोळ्यात तेल घालून करीत असतात. अशा वेळी मानवी चुकांमुळे एखादा अपघात घडल्यास किंवा मोटरमनला हार्टऍटॅक किंवा चक्कर आल्यास त्याच्यासह दोन ते अडीच हजार प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे मेल आणि एक्प्रेसच्या इंजिन आणि लोकलच्या मोटरमन कॅबमध्ये सीव्हीव्हीआरएस यंत्रणा दृश्य व ध्वनी रेकॉर्ड करणारे कॅमेरे बसविण्याची योजना आहे. पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या 226 इंजिनात कॅमेरे बसविण्याची योजना आहे, तर 25 लोकलच्या मोटरमन व गार्डच्या कॅबमध्ये कॅमेरे बसविण्याची योजना असून त्यासाठी मार्चपर्यंत टेंडर निघणार असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी स्पष्ट सांगितले. तर मध्य रेल्वेच्या 30 इलेक्ट्रिक (लोकोमोटीव्ह) इंजिनात सीव्हीव्हीआरएस यंत्रणा लागली आहे. तर मध्य रेल्वेकडे 165 लोकल असून 135 प्रत्यक्षात रुळांवर धावत असतात. आतापर्यंत तीन लोकलमध्ये ही यंत्रणा कार्यरत झाल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

जीपीएसमुळे मदत पोहचविणे शक्य

सीव्हीव्हीआरएस सिस्टममध्ये ‘जीपीआरएस’ सिस्टम असल्याने अपघातावेळी इंजिनांची पोझिशन कळण्यास मदत होणार आहे. लोकलमधील मोटरमन व गार्डच्या कॅबच्या आत दोन आणि बाहेर दोन कॅमेरे बसविले जाणार आहेत. तर लांब पल्ल्याच्या इंजिनात 2 कॅमेरे कॅबमध्ये, 2 छताला, 2 समोर आणि 2 पाठी मागे असे एकूण 8 कॅमेरे लागणार आहेत.