धाराशिवमध्ये आढळले कोरोनाचे 2 रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 29 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात आणखी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 29 झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये प्रामुख्याने पर जिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांची संख्या जास्त आहे. शनिवारी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत जिह्यातील 41 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 34 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

या दोन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पहिला रुग्ण उमरगा तालुक्यातील कोथळी गावचा एक तरुण असून हा तरुण 15 मे रोजी पुणे येथून आला होता. या रुग्णांचा अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आला असता तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदरील तरुणाचा अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने कोथळी व मुरूम परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्रीच या तरुणाच्या कुटुंबातील आई-वडिल, भाऊ यांच्यासह संपर्कातील सहा व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. तर कळंब तालुक्यातील शिराढोण येथील एक महिला कांही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली होती. त्या महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी सदरील महिलेच्या 80 वर्षीय सासूचा अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 29 एवढी झाली असून 6 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.