
सामना ऑनलाईन, नगर
महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याला गर्दी जमवण्यासाठी ग्रामविकास खात्याने लाखो रूपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 19 तारखेला शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी ग्रामविकास खात्याने ही उधळपट्टी केल्याचा आरोप होत असल्याने ही बाब जरा जास्तच गंभीर आहे.
पंतप्रधान आवास योजनेच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमाला माणसे जमावीत म्हणून पाच जिल्ह्यांतील 40 हजार लाभार्थींना आणण्यासाठी 800 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांचा नाश्ता, येण्या-जाण्याची सोय व बसेसवर बॅनर लावण्यासाठीही मोठा खर्च करण्यात आला आहे. मोदी लाट ओसरलेली असून या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही ही भीती वाटत असल्याने खर्च करून माणसं गोळा केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. पंतप्रधान आवास योजना ही पूर्वीच्या इंदिरा आवास योजना व इतर काही योजनांचे एकत्रीकरण करून करण्यात आली आहे. तीही व्यवस्थितपणे न राबवल्यामुळे लाभार्थी शोधण्याची वेळ आलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना राज्यपाल तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. चार दिवसापासून येथे मोठ्या कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पाच हजार अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते शिर्डी येथील साई संस्थांच्या विविध कामांचे भूमिपूजन होणार आहे.
summary- 2 crore expenses on pm modi program in shirdi




























































