श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात जेडीएसच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू; पाचजण बेपत्ता

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

श्रीलंकेत रविवारी झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 290 वर पोहचली आहे. तर जखमींची संख्या 500 वर गेली आहे. या बॉम्बस्फोटात जनता दल सेक्युलर पक्षाच्या (जेडीएस) दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर पाचजण बेपत्ता आहेत. या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. या प्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली आहे.

या बॉम्बस्फोटात जेडीएसच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला परदेश मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. के.जी. हनुमानथरयप्पा आणि एस. रंगरप्पा अशी मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. तसेच जेडीएसचे पाच कार्यकर्ते बेपत्ता आहेत. कार्यकर्त्यांचा मृत्यूच्या बातमीने खेद झाल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी सांगितले. या वृत्ताने आपल्याला दुःख झाले आहे. या कार्यकर्त्यांना आपण चांगल्याप्रकारे आळखत होतो. त्यांच्याशी आपले व्यक्तीगत संबंध होते. पक्षासाठी ते झटत होते. या कठीण प्रसंगात आपण आणि आपला पक्ष त्यांच्या कटुबीयांसोबत आहोत असे त्यांनी सांगितले.

या हल्ल्यांमागे तौहिद जमात या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संघटनेचा एक गट तामीळनाडूतही सक्रीय आहे. श्रीलंकेतील मुस्लीम महिलांसाठी शरियत कायदा लागू करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात मशीदींच्या निर्माणासाठी या संघटनेकडून प्रोत्साहन देण्यात येते. तसेच याआधीही या संघटनेने घातापाती कारवाया केल्या आहेत. श्रीलंकेतील बौध्द मूर्त्यांनांही या संघटनेने नुकसान केलेले आहे. सिरीयातून परतलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांशी या हल्ल्याचा संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अटक केलेल्या 24 संशियतांची कसून चौकशी करण्यात येत आहे.