
सामना प्रतिनिधी। बदनापूर
जालना जिल्ह्यातील व बदनापूर तालुक्यातील किन्होळा गावात पोलिसांनी शेतात छापा मारून गांज्याची 61 ओली झाडे जप्त केली असून त्याचे वजन 18 किलो भरले आहे. या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तपासणीसाठी 2 किलो वजनाची झाडे प्रयोगशाळेत तातडीने
पाठविण्यात आली आहेत. बाजारात या गांज्याची किंमत 2 लाख 70 हजार रुपये आहे.
एका शेतकऱ्याने गांज्याची लागवड केल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली.
रविवारी मध्यरात्री एका व्यक्तीस चौकशीसाठी बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी चौकशीत त्याने शेतात गांजा लावत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी पोलीस उपअधीक्षक शिलवंत ढवळे, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोलकर, पोलीस उपनिरीक्षक चैनशिंग गुशिंगे, शेख इब्राहिम, किशोर पुंगळे सह आदी कर्मचारी सकाळी 11 वाजता तालुक्यातील किन्होळा येथे रवाना झाले. गावापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या टेकडीच्या दिशेने शेतात गेले असता त्या ठिकाणी एका शेतात कापूस पिकामध्ये गांज्याची हिरवी झाडे आढळून आली व पोलिसांनी 61 झाडे उपटून काढली व वजन केले असता 18 किलो भरले. या वेळी सरकारी पंच म्हणून बदनापूर तहसिलचे नायब तहसिलदार संजय शिंदे, तलाठी ए. वाय. पठाण, कृषी विभागातील सचिन घुगे उपस्थित होते तर मोबाईल फॉरेंसिक विभागाचे सहायक रासायनिक
पी.के. सोनगिरे यांचीही उपस्थिती होती.
दरम्यान किन्होळा येथे गांज्याची झाडे लागवड केल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरातील अनेक गावातील नागरिक जमा झाले होते पोलिसांनी 2 किलो गांज्याची झाडे तपासणीसाठी तातडीने प्रयोगशाळेत पाठविली असून अंदाजे 18 किलो गांज्याची किंमत 2 लाख 70 हजार रुपय आहे.या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

































































