20 बांगलादेशी घुसखोरांना आठ महिन्यांचा तुरुंगवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैध पासपोर्टशिवाय हिंदुस्थानात प्रवेश केलेल्या 20 बांग्लादेशी घुसखोरांना महानगर दंडाधिकाऱयांनी दोषी ठरवले. न्यायालयाने प्रत्येक दोषीला आठ महिन्यांचा तुरुंगवास व चार हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास तुरुंगवासाची मुदत 16 महिन्यांपर्यंत वाढवली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

19 ऑक्टोबर 2023 रोजी बोरिवली पोलिसांनी तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर नालासोपारा, विरार आणि पुणे येथून आणखी 17 बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींनी वैध पासपोर्टशिवाय हिंदुस्थानात प्रवेश केला आणि नंतर पासपोर्ट, आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्रासारखी कायमस्वरूपी रहिवाशी कागदपत्रे बनवल्याचे सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांवरून सिद्ध झाले. त्याआधारे न्यायालयाने 20 बांगलादेशींना शिक्षा सुनावली.