
कोविडच्या संसर्गात दोन्ही पालक गमावलेल्या अठरा वर्षांपर्यंतच्या बालकांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोनामुळे 143 बालकांचे आई व वडील हिरावले तर 4 हजार 935 मुलांनी आई किंवा वडिलांचे छत्र गमावले आहे. कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांचा शोध घेताना राज्यात जवळपास तीन हजार महिलांचे पती कोरोनाने हिरावून घेतल्याचे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर अनाथ बालकांसाठी विविध योजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोविडच्या साथीत दोन्ही पालक गमावलेल्या ताह्या बाळांपासून 18 वर्षांपर्यंतच्या बालकांना महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
त्याशिवाय अनाथ बालकांना नोकरी व शिक्षणात एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने अलीकडेच घेतला आहे. तसेच अनुसूचित जातींप्रमाणे वय, परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
































































