
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
होय! ‘ईव्हीएम’ हॅक करता येते, असे ठामपणे सांगतानाच 2014 ची लोकसभा निवडणूक फिक्स्ड होती. त्यात ‘ईव्हीएम घोटाळा’ करूनच भाजपने मतांची लयलूट केली, असा खळबळजनक दावा हिंदुस्थानातील सायबर एक्सपर्ट सय्यद सुजा याने आज लंडन येथील एका पत्रकार परिषदेत केला. मागील लोकसभा निवडणुकीवेळी उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्लीसह अनेक राज्यांत ‘ईव्हीएम’मध्ये ‘हेराफेरी’ करण्यात आली होती, असे त्याने सांगितले. त्याला युरोपातील ‘इंडियन जर्नालिस्ट्स असोसिएशन’ने पत्रकार परिषदेत पेश केले.
आपल्या ‘टीम’मधील काही सहकाऱ्यांच्या हत्या झाल्यानंतर जिवाच्या भीतीने आपण 2014 सालातच हिंदुस्थानातून पळ काढला, असे सुजा याने सांगितले. आपल्या तज्ञ सहकाऱ्यांनी ईव्हीएम हॅक करण्याचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडले नसते तर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तो पक्ष पुन्हा जिंकला असता, असेही तो म्हणाला.
ईव्हीएम हॅक करण्यासाठी ‘लो फ्रिक्वेन्सी सिग्नल’ भाजपला मिळवून देण्यात ‘रिलायन्स जिओ’ या कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावली, असे सांगून तो म्हणाला की, भाजपने ईव्हीएम हॅक करण्यासाठी वापरलेले मॉडय़ूलेटर्स हे ट्रान्समिशनच्या बाबतीत लष्कराच्या तोडीचे होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2015 मध्ये आम्ही भाजपचे ईव्हीएम हॅकिंग उधळून लावले. ईव्हीएम हॅकिंगमध्ये भाजपसहीत काँग्रेस, समाजवादी पार्टी, आप, बसपा यांचाही हातखंडा आहे, असेही सुजा याने या पत्रकार परिषदेत सांगितले. 2014च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपचा ईव्हीएम घोटाळा ठाऊक झाल्यामुळेच त्या पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली. इतकेच नाही तर त्यांच्या अपघाती मृत्यूचा तपास करणारे एनआयएचे अधिकारी तंझिल अहमद यांनाही संपवण्यात आले, असा आरोप सुजा सय्यद याने केला.
सुजा सय्यद कोण?
‘ईव्हीएम’ची संरचना आणि ते विकसित करण्याचे काम इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ईसीआयएल) या सरकारी कंपनीने केलेले आहे. सय्यद सुजा याने तिथे तंत्रज्ञ म्हणून काम केले आहे. त्या कंपनीने ईव्हीएम हॅक करता येऊ शकते काय, आणि ते कसे करता येईल, याचा शोध घेण्याचे काम त्याच्यावरच सोपवले होते.
पत्रकार परिषदेसाठी आपण निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांनाही निमंत्रित केले होते. पण काँग्रेस नेते कपिल सिब्बल हे एकटेच उपस्थित राहिले, असे सुजा म्हणाला.



























































