
नववर्षाचा पहिला महिना नौदलासाठी खूप विशेष आहे. कारण एकाच वेळी तीन स्वदेशी युद्धनौका, पाणबुडय़ा मिळणार आहेत. आयएनएस सुरत आणि निलगिरी युद्धनौका, तसेच वागशीर पाणबुडीने सागरी ताकद वाढणार आहे.
आयएनएस सुरतः आयएनएस सुरत हे एक स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. विशाखापट्टणम क्लास डिस्ट्रॉयर श्रेणीतील चौथे आणि शेवटचे जहाज आहे. माझगाव डॉक येथे ही युद्धनौका तयार करण्यात आली. ‘आयएनएस सुरत’ 7400 टन वजन आणि 164 मीटर लांब आहे. त्यावर पृष्ठभागावर हल्ला करणारी मिसाईल वर्टिकल लॉँचर लावण्यात आले आहेत. त्यावर आधुनिक सर्विलान्स रडार लावण्यात आलंय. शत्रूच्या पाणबुडय़ा नष्ट करण्यासाठी रॉकेट लाँचर आणि
टॉर्पेडो लाँचरही आहे.
निलगिरी युद्धनौकाः निलगिरी ही प्रोजेक्ट 17ए अंतर्गत तयार होणारी पहिली युद्धनौका आहे. या युद्धनौकेची 75 टक्के उपकरणे स्वदेशी कंपन्यांकडून घेतलेली आहेत. सुमारे 6600 टन वजन आणि ताशी 30 किमी वेगाने धावू शकते. एअर डिफेन्स गन, बराक 8 लाँग रेंज सफ्रेस टू एयर मिसाईल, ब्रह्मोस, वरुणास्त्र, रॉकेट लाँचरने परिपूर्ण असेल. त्यावर दोन हेलिकॉप्टर सहजरीत्या उतरू शकतात.
वागशीर पाणबुडीः वागशीर ही प्रोजेक्ट– 75अंतर्गत सहावी, तर स्कॉर्पिन क्लासची शेवटची पाणबुडी आहे. ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. 221 फूट लांब आणि 40 फूट उंच आहे. शत्रूची नजर चुकवून टॉर्पेडो आणि अँटी शिप मिसाईलद्वारे शत्रूवर अचूक हल्ला करू शकते. पाणबुडीवर एकाच वेळी 18 टॉर्पेडो ठेवण्याची व्यवस्था आहे. ही पाणबुडी पाणी व जमीन अशा ऑपरेशनसाठी सक्षम आहे.