
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या पहिल्या ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 58 वर्षे लागली. पुढच्या ट्रिलियनपर्यंत जाण्यासाठी 12 वर्षे तर तिसऱया ट्रिलियनसाठी अवघी पाच वर्षे लागली. सरकार ज्या गतीने एकाचवेळी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांची मोठय़ा संख्येने अंमलबजावणी करतेय ते पाहता 2030 च्या अखेरीस हिंदुस्थान ही जगातील तिसरी तर 2050 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलरसह जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी व्यक्त केला.
मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाऊंटंट्सला संबोधित करताना ते बोलत होते. कोरोनाची महामारी, रशिया-युक्रेन युद्ध, हवामान बदलामुळे जागतिक नेतृत्वासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली असल्याचेही अदांनी यांनी निदर्शनास आणले.

























































