इंटरनेट शटडाऊनमुळे 21,336 कोटींचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

देशातील विविध राज्यांतील हिंसाचार, आंदोलनांचे लोण इतरत्र पसरू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट शटडाऊन केल्यामुळे गेल्या 6 वर्षांत 21 हजार 336 कोटींचे नुकसान झाले आहे. या पैशात केंद्र सरकारची स्वच्छ भारत मोहीम अनेकदा राबवणे शक्य झाले असते. इंडियन काऊंन्सिल फोर रीसर्च ऑन इंटरनॅशनल इकोनॉमिक रिलेशन (आयसीआरआयईआर)च्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे.

– गेल्या सहा वर्षांत देशात 12,615 तास मोबाईल इंटरनेट बंद असल्यामुळे सुमारे 16 हजार 590 कोटींचे नुकसान झाले.

– देशात 2015-16मध्ये 22 वेळा इंटरनेट शटडाऊन केल्यामुळे 6 हजार 485 कोटींचे नुकसान झाले. युद्धाने होरपळलेल्या इराकचे जेवढे नुकसान झाले तेवढे हे नुकसान होते.

जम्मू-कश्मीर, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक शटडाऊन
चकमकी, हिंसक आंदोलने आणि दगडफेकीमुळे हे लोण इतरत्र पसरू नये म्हणून जम्मू-कश्मीरच्या अनेक भागांत इंटरनेट सेवा अनेक दिवस बंद ठेवली जाते. 2012 ते 2017 या सहा वर्षांत 60 वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. 2012 नंतर हे प्रमाण 32 टक्क्यांपर्यंत वाढले तर याच दरम्यान, देशभरात इंटरनेट शटडाऊनचे प्रमाण हे 70 टक्क्यांपर्यंत वाढले. जम्मू-कश्मीरनंतर इंटरनेट शटडाऊनमध्ये पश्चिम बंगालचा नंबर लागतो. शटडाऊनमुळे या दोन्ही राज्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

गुजरातचे सर्वाधिक आर्थिक नुकसान
गुजरातमध्ये 2012 ते 2017 या सहा वर्षांत 10 वेळा 724 तास इंटरनेट सेवा बंद करावी लागली. 2015 मध्ये पटेल आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनामुळे मोबाईल, नेट, इंटरनेट बँकिंग आणि एसएमएस सेवा बंद ठेवावी लागली. त्यामुळे गुजरात सरकारला तब्बल 7 हजार 844 कोटींचे नुकसान झाले. गुजरातच्या अर्थसंकल्पापेक्षा 4.3 टक्क्यांनी ते जास्त हेते. आंदोलनादरम्यान, अहमदाबाद, बडोदा, सूरत, राजकोट आणि मेहसाणामधील सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. नेटबँकिंग 90 टक्के बंद पडल्यामुळे एकटय़ा बँकिंग क्षेत्राला 1500 कोटींचा फटका बसला होता. गुजरातनंतर जम्मू-कश्मीर, हरयाणा आणि ईशान्येकडील राज्यांना शटडाऊनचा आर्थिक फटका बसला आहे.