मोदी सरकारची एक्स्पायरी डेट संपली, कोलकात्यातील सभेत 22 पक्षांचे महागठबंधन औषध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

कोलकाता येथील ब्रिगेड मैदानावर झालेल्या प्रचंड महासभेत 22 विरोधी पक्षांचे महागठबंधनाचे दर्शन घडले. ‘दिल्ली में सरकार बदल दो’चा नारा यावेळी देण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारची एक्सपायरी डेट संपली आहे. साडेचार वर्षांत जर्जर झालेल्या देशाला ठणठणीत करण्यासाठी महागठबंधन हेच औषध लागू पडेल, असा हल्लाबोल यावेळी विरोधकांनी केला.

या महागठबंधनचे आयोजन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केले होते. महासभेला प्रचंड गर्दी उसळली होती. यावेळी माजी पंतप्रधान देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुक अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, तेलगू देसमचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, तसेच ज्येष्ठ नेते शरद यादव, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आदी नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्ष सोनिया गांधी या महासभेला उपस्थित नव्हते, मात्र काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांनी हजेरी लावली. दरम्यान, या सभेला माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हेही उपस्थित होते.

विरोधकांचे नेतृत्व कोण करणार, पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे प्रश्न गौण आहेत. केंद्रातून भाजप सरकार हटविणे हेच आमचे मुख्य लक्ष्य असून पंतप्रधान कोण हे सत्तेत आल्यावर ठरवू असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

… तर तुम्हाला का सोडायचे?
यावेळी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सीबीआय, ‘ईडी’सारख्या तपासयंत्रणांचा गैरवापर करून लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव, मायावती या नेत्यांच्या मागे ससेमिरा लावण्यात आला आहे. आमच्या मागे असे ससेमिरा लावणार असाल तर तुम्हाला का सोडायचे? व्यक्तिगत पातळीवर लक्ष्य करण्याची आमची संस्कृती नाही. पण तुमच्याबाबत ही मर्यादा आम्ही पाळणार नाही असा इशारा त्यांनी भाजप सरकारला दिला.

कोण काय म्हणाले
शरद पवार – या महारॅलीत 22 पक्ष सहभागी झाले आहेत. आम्ही एकत्र आलो आहोत. देशात सत्ताबदल हवाच. पंतप्रधान होण्यासाठी आपण येथे आलेलो नाही. भाजपची सत्ता देशातून गेली पाहिजे यासाठी एकत्र आलेलो आहोत.

शरद यादव – देश वाचविण्यासाठी भाजपला पराभूत करा. मोदी सरकारला गंगेत विसर्जित करण्यासाठी विरोधी पक्षांची ही एकजूट आहे.

फारुख अब्दुल्ला – ‘ईव्हीएम’ ही चोर मशीन असून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची पद्धत पुन्हा सुरू केली पाहिजे. मोदी सरकारमुळे देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. भाजपला हटविणे गरजेचे असून पंतप्रधान कोण होईल याचा निर्णय नंतर घेऊ.

यशवंत सिन्हा – भाजपने ‘सब का साथ ले के सबका विनाश किया’. सर्व विरोधकांनी मिळून भाजपविरोधात एकच उमेदवार द्यायला हवा. तेव्हा भाजपचा पराभव निश्चित आहे. मुद्दा मोदी नाही तर मुद्दा देशाच्या समस्या आहेत.

शत्रुघ्न सिन्हा – अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये लोकशाही होती. सध्याचे सरकार हुकूमशाही आहे. मी भाजपला उत्तर देण्यासाठी नाही तर जनतेसाठी बांधील आहे. पंतप्रधान मोदी काहीही घोषणा करू शकतात. नदी नाही तरीही नदीवरील पूल बांधण्याचे आश्वासन ते देऊ शकतात.