
सामना ऑनलाईन, मुंबई
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या ८ पदाधिकाऱ्यांची ट्विटर हँडलच्या निळ्या दांड्या गुल झाल्याने म्हणजेच व्हेरिफाईड अकाऊंटचा दर्जा हिरावून घेतल्याने पूनम महाजनांचे सहकारी भडकले आहेत. हे प्रताप भाजपच्याच आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी केल्याचा तक्रार त्यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या ट्विटर हँडलप्रमाणेच युवा मोर्चाच्या काही राज्य शाखांची ट्विटर हँडलही डी व्हेरिफाय करण्यात आली आहे. अशी एकूण मिळून २२ ट्विटर हँडलच्या निळ्या दांड्या म्हणजेच ब्ल्यू टीक काढून घेण्यात आल्या आहेत.
१३ ऑक्टोबर रोजी पूनम महाजन यांनी युवा मोर्चाच्या १३ पदाधिकाऱ्यांची अधिकृत आणि ट्विटरकडून ब्ल्यू टीकचा दर्जा मिळालेली व्हेरिफाईड अकाऊंटची यादी सादर केली होती. ही यादी सादर झाल्यानंतर अमित मालवीय यांच्या आयटी सेलने ट्विटरला माहिती दिली की या अकाऊंटना भाजपने निर्धारीत केलेल्या प्रक्रियेला डावलून ब्ल्यू टीकचा दर्जा मिळवण्यात आलेला आहे, त्यामुळे ही ब्ल्यू टीक काढून घेण्यात यावी. यानंतर जवळपास २२ ट्विटर हँडलचा व्हेरिफाईड अकाऊंटचा दर्जा काढून घेण्यात आला.
या पदाधिकाऱ्यांची ट्विटर अकाऊंट झाली डी-व्हेरिफाईड
- कपिल परमार, प्रमुख, सोशल मिडिया, आय.टी
- चारु प्रज्ञा, प्रमुख, विधी विभाग
- शिवम छाब्रा, राष्ट्रीय माध्यम प्रमुख
- दिग्विजय सिंह, प्रमुख, स्टडी सर्कल
- नेहा जोशी, सहप्रमुख, माध्यम विभाग
- देवांग दवे, समन्वयक, आय.टी आणि सोशल मीडिया समिती
- प्रिया शर्मा, सहप्रमुख, स्टडी सर्कल
- अनंत प्रकाश, सदस्य, स्टडी सर्कल
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने पत्राद्वारे केलेल्या तक्रारी म्हटलंय की मालवीय यांनी हे सगळे उद्योग युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी केले असल्याचा आरोप केला आहे. एका इंग्रजी दैनिकाने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटलंय की याचा फटका लोकसभा निवडणुकांपूर्वी युवा मोर्चातर्फे नागरिकांशी संवाद साधण्यावर होत आहे आणि भविष्यात त्याचा फटका बसू शकतो. मालवीय हे भयंकर अहंकारी झाले असून त्यांचा अहंकार दुखावल्याने सूडबुद्धीने ते आमच्याशी वागत असल्याचा भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे.



























































