
सामना ऑनलाईन । मुंबई
ऍण्टॉप हिल येथील विजयनगरमध्ये आज पहाटे तीनच्या सुमारास एकच हाहाकार उडाला. अज्ञात इसमाने परिसरात उभ्या केलेल्या गाडय़ांना आग लावली. गाडय़ा बाजूला खेटून पार्क केल्याने आगीत 22 दुचाकी आणि दोन चारचाकी गाडय़ांचे नुकसान झाले. याप्रकरणी ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयनगर झोपडपट्टीत चिंचोळ्या जागेत तेथील रहिवासी त्यांच्या गाडय़ा पार्क करतात. त्यानुसार नेहमीप्रमाणे बुधवारी रात्रीदेखील त्या ठिकाणी दुचाकी व चारचाकी पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या, मात्र मध्यरात्री तीनच्या सुमारास एका दुचाकीला आग लागल्याची घटना घडली. ऍण्टॉप हिल पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.




























































