सातारा जिल्ह्यातील 229 शाळा दुर्गम क्षेत्रात, पाटण तालुक्यात सर्वाधिक 122 शाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सातारा जिल्ह्यात दोन हजार 732 प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी 229 शाळा दुर्गम क्षेत्रात येत असून, पाटण तालुक्यात सर्वाधिक 122 दुर्गम शाळा आहेत. कोरेगाव, खटाव, फलटण, माण या चार तालुक्यांतील एकही शाळा दुर्गम क्षेत्रात नाही.

जिल्हा परिषदेने सात निकषांपैकी चार किंवा चारपेक्षा जास्त निकष पूर्ण करणाऱया शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यासाठी दुर्गम व सुगम क्षेत्रात येणाऱया शाळांची माहिती संकलित करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त क्षेत्रात असणारे गाव, वार्षिक पर्जन्यमान दोन हजार मिलिमीटरपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव, हिंस्त्र्ा वन्यप्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश, वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव, वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव, रस्त्याने न जोडलेल्या शाळा, डोंगरी भाग प्रदेश, राष्ट्रीय-राज्य महामार्गापासून दहा किलोमीटरपेक्षा जास्त दूर अशा सातपैकी चार निकष पूर्ण करणाऱया शाळा दुर्गम क्षेत्र म्हणून जाहीर झाल्या आहेत.

दुर्गम क्षेत्रात असलेल्या शाळा आता सुधारित दुर्गम क्षेत्रातील शाळांच्या यादीतून वगळण्यात आल्या आहेत. शाळा सुधारणेपूर्वी कार्यरत शिक्षकांनी दुर्गम क्षेत्रात सेवा केली असल्याने विशेष बाब म्हणून केवळ 2022-23 च्या बदल्यांमध्ये या शाळांमध्ये सेवा ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यावर 2 एप्रिलपर्यंत गटशिक्षण अधिकाऱयांकडे हरकती सादर करायच्या होत्या. प्राप्त हरकतींबाबत विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी छाननी करून शिफारशी व अभिप्रायासह 4 एप्रिलपर्यंत जिल्हा परिषद आस्थापनेकडे समक्ष सादर कराव्यात, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिल्या होत्या.