नगरमध्ये ‘रोहयो’ची 23 हजार कामे अपूर्ण,  बहुतांशी घरकुलांची कामे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात ‘नरेगा’ (रोजगार हमी) योजनेतील 22 हजार 845 कामे अपूर्ण आहे. यांतील जवळपास 18 हजार कामे ही एकटय़ा घरकुल योजनेतील असून, अपूर्ण कामे सर्वाधिक नेवासा तालुक्यातील आहेत. दरम्यान, 2019-20मध्ये मंजुरी दिलेल्या कामांपैकी 875 कामेदेखील अपूर्ण असून, ती पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्याची डेडलाइन देण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत 89 हजार 908 कामांना मंजुरी देण्यात आली होती. यांतील 67 हजार 64 कामांना मंजुरी देण्यात आली आहे, तर 22 हजार 845 कामे अपूर्ण आहेत. अपूर्ण कामांमध्ये सर्वाधिक घरकुलांची कामे असून, त्यानंतर नवीन जनावरांच्या गोठय़ांच्या, विहिरींच्या कामांचा समावेश आहे. अपूर्ण असणाऱ्या घरकुलांच्या कामांचा तिसरा आणि चौथा हप्ता अदा केलेल्या लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या कामांचे मस्टर पूर्ण करण्याची सूचना दिली आहे.

‘रोजगार हमी योजने’चे संबंधित कामांचे मस्टर भरून घेतल्यावर संबंधित कामे तांत्रिकदृष्टय़ा पूर्ण होऊन अपूर्ण कामांची संख्या कमी होणार आहे. त्याचसोबत 2019-20मधील 875 कामे अपूर्ण असून, या कामांना उशिरा मान्यता दिल्याने ती उशिरा सुरू झाली होते. मात्र, तरीदेखील त्यांना पूर्ण करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. यात शोषखड्डे, शौचालय, विहिरींच्या कामांचा समावेश आहे.

तालुकानिहाय अपूर्ण कामे

z अकोले – 1965, जामखेड – 1173, कर्जत – 2507, कोपरगाव -1346, नगर – 778, नेवासा – 2722, पारनेर – 1486, पाथर्डी – 2143, राहाता – 1030, राहुरी – 757, संगमनेर – 2440, शेवगाव -1501, श्रीगोंदा – 1929 आणि श्रीरामपूर – 1068 यांचा समावेश आहे.