
विजेच्या बचतीसाठी देशभरातील पदपथांवर दोन कोटी एलईडी दिवे बसवल्यानंतर आता ग्राहकांना विजेचे योग्य बिल मिळावे म्हणून तब्बल 25 कोटी स्मार्ट मीटर बसवणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत जुने मीटर बदलून नवीन मीटर वीज कंपन्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी ‘ईईएसएल’ने एनआयआयएफच्या मदतीने इंटेलिस्मार्ट उपक्रमाची घोषणा केली आहे.
देशभरातील अनेक वीज वितरण कंपन्या आजही जुने वीज मीटर ग्राहकांना पुरवतात. त्यामुळे वीज कर्मचाऱयाला प्रत्येक महिन्याला प्रत्यक्ष मीटरजवळ जाऊन रीडिंग घ्यावे लागते. त्यामध्ये तांत्रिक आणि मानवी चुका होत असल्याने ग्राहकांना अचूक बिल मिळत नाही. त्या पार्श्वभूमीवर जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याचे ‘ईईएसएल’ने स्पष्ट केले आहे.
































































