
टेम्पोतून रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्य़ा त्रिकुटाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. त्याशिवाय चंदनवाहतूक करणारा टेम्पोही जप्त करण्यात आला आहे.
विकी साबळे, रोहित रूद्राप आणि अॅलन वाघमारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. खंडणी विरोधी पथक दोन पेट्रोलिंग करीत असताना, कोंढव्यातून मोटारीतून सोलापूरला चंदनाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस अमलदार भूषण शेलार आणि अमोल पिलाणे यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या पथकाने लोणी काळभोर टोलनाक्याजवळ सापळा रचला. त्यानुसार पथकाने परिसरातून संशयास्पद चाललेल्या टेम्पो चालकाला थांबवून तपासणी केली. त्यावेळी टेम्पोत 27लाख रूपये किंमतीचे 270 किलो रक्तचंदन आढळले. याप्रकरणी पथकाने चालक विकी साबळे आणि साथीदार रोहित रूद्राप याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांना चंदन विक्रीचा माल पुरविणाऱ्य़ा अॅलन वाघमारे याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पथकाने वाघमारे यालाही अटक केली. याप्रकरणी आणखी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे.




























































