युरोप, चीनमधील स्टेल्थ बी-2ला मुंबईचा ‘दे धक्का! जिनोम सिक्वेसिंगमध्ये आढळलेले 271 रुग्ण ठणठणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिसरी लाट पूर्ण नियंत्रणात आली असली तरी युरोप-चीनसह काही देशांमध्ये ओमायक्रोनचा नवा व्हेरिएंट ‘स्टेल्थ बी-2’ने पुन्हा एकदा धडकी भरवली आहे. मात्र मुंबईने कोरोनाच्या या व्हेरिएंटला याआधीच हरवल्याची समाधानकारक माहिती समोर आली आहे. पालिकेने केलेल्या जिनोम सिक्वेंसिंगमध्ये ‘स्टेल्थ बी-2’चे 271 बाधित आढळले होते. मात्र हे सर्व रुग्ण आता ठणठणीत झाले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आतापर्यंत तीन लाटा येऊन गेल्या. डिसेंबरअखेर आलेली सर्वाधिक   रुग्णसंख्येची तिसरी लाटही आता पूर्ण नियंत्रणात आली असून दररोज दहा हजारांवर चाचण्या होत असताना केवळ 30 ते 40 रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबईसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मात्र युरोप-चीनमध्ये आलेल्या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबई आणि हिंदुस्थानसह अनेक देशांत टेन्शन निर्माण झाले आहे. मात्र मुंबईत आलेल्या ‘ओमायक्रोन’च्या तिसऱया लाटेतच या नव्या व्हेरिएंटला रुग्णांनी हरवल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या जिनोम सिक्वेंसिंगमध्ये ही समाधानकारक आकडेवारी समोर आली असल्यामुळे तूर्तास तरी मुंबईला दिलासा मिळाला आहे.

…तरीही पालिका अलर्ट

  • मुंबईत 99 टक्क्यांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. तर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, 60 वर्षांवरील सर्वांना प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे. शिवाय 18 वर्षांवरील सर्वांना प्रिकॉशन डोस देण्यासाठी केंद्राकडून नियोजन सुरू झाले आहे.
  • त्यामुळे मुंबईला धोका नसल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र नव्या व्हेरिएंटची लाट येऊन सर्वाधिक रुग्णसंख्या नोंद झाली तरी पालिकेकडे सुमारे एक लाख बेडची तयारी आणि आवश्यक डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱयांची तरतूद असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 24 पैकी 23 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही गैरसमज न बाळगता लस घ्यावी. कोरोना पूर्णपणे जाईपर्यंत कोरोना खबरदारी घ्यावी.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त