
सामना ऑनलाईन । भुवनेश्वर
ओडिशातील फनी चक्रीवादळाचा जोर ओसरला असला तरी त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आज 29 वर पोहोचली. दोन दिवसांनंतर प्रशासनाकडून जीवित आणि वित्तहानीचा पंचनामा करणे सुरू झाले आहे. दरम्यान, फनीमुळे पाणीटंचाई आणि वीजपुठरठा खंडित झाल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत.
फनीचा जोरदार फटका पुरी आणि खुर्दा जिल्ह्याला बसला असून मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज मदत जाहीर केली. पुरी आणि खुर्दामधील कुटुंबातील प्रत्येकाला 50 किलो तांदूळ, प्रत्येकी 2 हजार आणि पॉलिथिनचे कव्हर देण्यात येणार आहे. खुर्दातील इतर भागासाठी तांदूळ, प्रत्येकी 1 हजार रुपये आणि पॉलिथिनचे कव्हर देण्यात येणार आहे. तर इतर भागातील लोकांसाठी तांदूळ, 500 रुपये रोख देण्यात येणार आहे, अशी घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचबरोबर पुढील 15 दिवसांसाठी सगळय़ांना विनामूल्य जेवण पुरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ओडिशाला महाराष्ट्राकडून 10 कोटींची मदत
फनी वादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशाला महाराष्ट्र सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. महाराष्ट्राने ओडिशातील पुनर्वसन व मदतकार्यासाठी 10 कोटींची मदत देऊ केली आहे. कठीण आणि संकटाच्या काळात महाराष्ट्र ओडिशातील जनतेच्या सोबत आहे. फनी वादळाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र ओडिशाला 10 कोटींची मदत देत आहे, असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.


























































