
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील देशभारत प्रसिद्ध असणाऱ्या खातुश्यामजी मंदिरात सोमवारी चेंगराचेंगरी होऊन तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. सोमवारी सकाळी जत्रेनिमित्त मंदिरात भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी जमली होती. मात्र ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने ही दुर्घटना घडली. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून. याठिकाणी बचावकार्य सुरू आहे. सध्या मृतांपैकी केवळ एका महिलेची ओळख पटली आहे.
राजस्थानातील खातुश्यामजींच्या या मंदिरात देशभरातून भाविक जमतात. सोमवारी सकाळी मंदिराचे प्रवेशद्वार उघडताच भाविकांनी एकत्रितपणे मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परिणामी गर्दीचा ताण अचानक वाढला. यावेळी मंदिरात मोठ्याप्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अचानक चेंगराचेंगरी झाल्याने दर्शनासाठी आलेल्या तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जत्रेनिमित्त मंदिरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र सोमवारी भाविकांची गर्दी पोलिसांना हाताळता आली नाही. चेंगराचेंगरीनंतर भाविक एकमेकांच्या अंगावरून धावू लागले. यात अनेक भाविक जखमी झाले. पोलीस आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांनी जखमींना स्थानिक रुग्णालयात नेले. अपघातात बळी पडलेल्या अन्य दोन महिलांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




























































