कोरोना चाचणीसाठी नाशिकमध्ये महापालिकेची तीस पथके कार्यान्वित

राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. नाशिक शहरातील फेरीवाले, इतर व्यावसायिक आणि सफाई कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यासाठी तीस पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासन विविध पातळ्यांवर उपाययोजना करीत आहे. शहरात किराणा दुकानदार, फळ व भाजी विक्रेते, औषध विक्रेते, हातगाडीवरील विक्रेते, सलून चालक यांचा सातत्याने लोकांशी संपर्क येत असतो. हे लक्षात घेत त्यांची प्रथम कोविड-19 आर.टी.पी.सी.आर चाचणी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालये, रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, सर्व सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक यांचीही कोविड चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना रुग्णांच्या घरावर स्टिकर लावण्यात येणार असून चाळी, झोपडपट्ट्या अशा मोठ्या हॉटस्पॉटवरील कन्टेन्मेंट झोनमध्ये बॅरिकेड्सही लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी संबंधितांसाठी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील. शहरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही सुरू राहणार आहे. बाहेर फिरणार्‍या कोरोनाबाधितांवर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. महापालिका, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समन्वयाने उपाययोजना केल्या जात असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले.

विशेष अधिकार्‍याची नियुक्ती
राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध, सूचना यांची कडक अंमलबजावणी करून घेण्यासाठी इन्सीडंट कमांडंट म्हणून एका अधिकार्‍याची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांच्याकडे कन्टेन्मेंट झोनच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या