शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश, पालघर जिल्ह्यात उभारणार 300 बेडचे हॉस्पिटल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघर जिल्ह्यात मोठी औद्योगिक वसाहत असून हजारो कर्मचारी राज्य विमा योजनेत नोंदणीकृत आहेत. आजारी पडल्यास किंवा अपघाती उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. त्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र आता या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच पालघरमध्ये कर्मचारी राज्य विमा योजनेचे 300 बेडचे हॉस्पिटल उभारले जाणार आहे.

पालघर जिल्ह्यात एमआयडीसी, तीन शासकीय सहकारी औद्योगिक वसाहती, 5 हजार 757 लघु नोंदणीकृत उद्योग, 1 हजार 883 तात्पुरते लघु उद्योग आणि 427 मोठे, मध्यम उद्योग आहेत. पालघर जिल्ह्यात लघु औद्योगिक विकास महामंडळ, कोकण, एमएस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एमआयसीडी वुड बेस्ड कॉम्प्लेक्स वाडा यांनी स्थापन केलेल्या औद्योगिक वसाहती आहेत. याशिवाय सामूहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत एकूण 15 मोठे प्रकल्प उभारले जात आहेत. यापैकी 7 प्रकल्पांनी उत्पादन सुरू केले आहे.

मोठ्या संख्येने औद्योगिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी सध्या या भागात एकही विमा योजनेचे हॉस्पिटल नाही. वैद्यकीय सुविधांअभावी या भागातील औद्योगिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैद्यकीय गरजांसाठी दूरच्या ठिकाणी फरफट करून जावे लागते. त्यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक बोजा पडतो. यासाठी पालघरमध्ये विमा योजनेचे हॉस्पिटल व्हावे यासाठी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. यासाठी त्यांनी नुकतीच केंद्रीय श्रम रोजगार मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून लवकरच पालघरमध्ये 300 खाटांचे विमा योजने अंतर्गत हॉस्पिटल उभारले जाईल, अशी ग्वाही भुपेंद्र यादव यांनी दिली.

यांना मिळणार लाभ
तारापूर, वसई, तलसरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, डहाणू आणि मोखाडा यासह पालघरमध्ये सुमारे 1 लाख 9 हजार 464 कर्मचारी हे विमा योजनांमध्ये नोंदणीकृत आहेत. तर सुमारे 76 हजार 892 नोंदणी नसलेले कर्मचारी काम करतात.