मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये आणखी एकाची आत्महत्या, गळफास घेऊन संपवले जीवन

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून आत्महत्यांचे सत्रही सुरुच आहे. मराठा आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यात आणखी एकाने जीवन संपवले आहे. नांदेड जिल्ह्यातील ही सहावी आत्महत्या आहे.

‘मागील 10 दिवसांपासून मला मराठा आरक्षणासाठी क्रांती करावयाची आहे, मराठा आंदोलन क्रांतीसाठी मी माझे जीवन संपवत आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा, लाख मराठा’, अशी चिठ्ठी लिहून हडको परिसरातील शाहुनगर भागातील संभाजी बिग्रेडचे माजी जिल्हा संघटक साईनाथ व्यंकटी टरके (वय – 32) यांनी शुक्रवारी रात्री आपल्या निवासस्थानी गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी व्यंकटी टकरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

माझा मुलगा साईनाथ टरके हा मागील दहा दिवसापासून मला मराठा आरक्षणासाठी क्रांती करावयाची आहे, असे म्हणत होता. शुक्रवारी मध्यरात्री पावणे एकच्या दरम्यान त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने पँटच्या खिशात मी मराठा आंदोलन क्रांतीसाठी जीवन संपवत आहे, एक मराठा लाख मराठा असे लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील ही सहावी आत्महत्या आहे. यापूर्वी हदगाव तालुक्यात तीन जणांनी तर नायगाव तालुक्यात एकाने तर काल 14 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी भेट दिली. पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह हशासकीय रूग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक यु.डी.बुक्तरे हे करीत आहेत.