आरोपी उशाला अन् शोध 33 व्या वर्षाला, 1984 ला पळालेला ‘खान’ अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल पण ‘आरोपी उशाला अन् शोध 33 व्या वर्षाला’ असा प्रकार मुंबईमध्ये उघडकीस आला आहे. सोमवारी क्राईम ब्रँचने तुरुंगातून पळून गेलेल्या आरोपीला 33 वर्षानंतर अटक केली. चोरीच्या आरोपामध्ये अटकेत असताना आरोपीने भींतीवरून उडी मारून पलायन केले होते.

क्राईम ब्रँचच्या युनीट 8 चे पोलीस अधिकारी अरुण पोखरकर आणि त्यांच्या पथकाने सोमवारी सलिम रुकिया खान याला अटक केली. 1984 झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती, परंतु त्यानंतर सलिमने तुरुंगाच्या भींतीवरून उडी मारून पलायन केले होते. यानंतर त्याने गोरेगाव येथील राहते घर सोडून ठाण्यात मिरा रोड येथे लपून-छपून राहात होता. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सापळा लावून अटक करण्यात आली.

गेल्या 33 वर्षामध्ये त्याच्या पेहरावात बदल झाल्याने ओळख पटवणे अवघड होते, असे पोखरकर यांनी सांगितले. क्राईम ब्रँचने तब्बल एक महिना त्याच्यावर नजर ठेवली होती आणि ओळख पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नव्वदच्या दशकामध्ये चोरीच्या गुन्ह्यामध्ये सलिम आणि तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सलिम पळून जाण्यात यशस्वी झाला होता.