34 टक्के मुंबईकरांना हायपर टेन्शन, तणावमुक्तीसाठी महापालिकेची आता ‘हर घर दस्तक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सततची धावपळ, अवेळी खाणे आणि जंकफूड अशा अनेक कारणांमुळे तब्बल 34 टक्के मुंबईकरांमध्ये ‘हायपर टेन्शन’ असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार पालिकेने पाच हजार जणांमध्ये हे ‘स्टेप’ सर्वेक्षण केले. त्यामुळे मुंबईकरांचा ‘तणाव’ कमी करण्यासाठी ‘आशा’ वर्कर्स, ‘एचआयव्ही’ आरोग्य सेविकांच्या माध्यमातून मुंबईतील घरोघरी जाऊन ब्लड प्रेशरची तपासणी केली जाणार असून औषधेही दिली जाणार आहेत.

मुंबईच्या तंदुरुस्तीसाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये मुंबईकरांची हायपर टेन्शनमधून सुटका करण्यासाठी पालिका महत्त्वपूर्ण मोहीम सुरू करणार असल्याचे आज अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यासाठी ‘आशा’ आणि ‘सीएचव्ही’ना आवश्यक ट्रेनिंग दिले जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन केल्या जाणाऱया तपासणीत ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त आढळल्यास त्यांना पालिकेच्या रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या मोहिमेत रुग्णावर केलेल्या उपचारांच्या परिणामांची खातरजमाही घरोघरी जाऊन केली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येणार आहे. या मोहिमेत कालांतराने कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, मधुमेह यासह इतर आजारांचाही समावेश केला जाणार असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. नीलम अंद्राडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, सार्वजनिक आरोग्य उपायुक्त संजय कुऱहाडे आदी उपस्थित होते.

शिवयोग केंद्रात 4500 जणांना योगाचे धडे

मुंबईकरांच्या दुरुस्तीसाठी पालिकेच्या माध्यमातून सुरू केलेल्या शिवयोग केंद्रात आतापर्यंत 177 शिवयोग केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये 25 ते 30 जणांचा गटात समावेश असून एकूण 4500 जण तज्ञ प्रशिक्षणांकडून योगाचे धडे घेत आहेत. आगामी सहा महिन्यांत शिवयोग केंद्रांची संख्या 300 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्टय़ असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

रेल्वे स्थानक, मॉलमध्येही होणार ‘बीपी’ तपासणी

मुंबईतील वाढत असणाऱया ब्लड प्रेशर आजाराचे निवारण करण्यासाठी पालिका लवकरच रेल्वे स्टेशन, मॉलमध्येही ‘बीपी’ तपासणी करण्यात येणार आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी नियोजन सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

बहुतांशी नागरिकांमध्ये ब्लड प्रेशरची समस्या असूनदेखील तपासणी होत नाही. त्यामुळे हा आजार वाढत गेल्याने कालांतराने हृदय, किडन्यांसह संपूर्ण शरीरावरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळे रेल्वे स्टेशन, मॉल अशा गर्दी होणाऱया ठिकाणी ब्लड प्रेशरची तपासणी करून औषधोपचार आणि आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

हॉस्पिटलमध्ये ‘हेल्थ कॉर्नर’

पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांसोबत येणाऱया नातेकाईकांचीही प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यासाठी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत ‘हेल्थ कॉर्नर’ सुरू केला जाणार आहे. या ठिकाणी ब्लड प्रेशरसह प्राथमिक तपासण्या केल्या जातील.

मुंबईकर मीठ जास्त खातात

आरोग्याच्या दृष्टीने माणसाला दररोज 5 ग्रॅम मीठ खाणे पुरेसे आहे. मात्र एका आरोग्य अहवालानुसार मुंबईकर दररोज 9 ते 10 ग्रॅम मीठ खातो. मीठ जास्त खाल्याने तहानही जास्त लागते. त्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायले जाते. त्यामुळे रक्ताचे आकारमान वाढते आणि परिणामी ब्लड प्रेशरही वाढतो, असे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

आरोग्य स्वयंसेवकांचे मानधन दुप्पट

पालिकेच्या ‘आशा’ वर्कर्स, आरोग्य सेविकांना दररोज मिळणाऱया 100 ते 200 रुपये मानधनात दुप्पट वाढ होणार आहे. या आरोग्य सेविकांच्या माध्यमातून पालिकेतर्फे मुंबईत घरोघरी आरोग्य तपासणी, पावसाळी आजार तपासणी आणि जनजागृतीचे कामही केले जाते. त्यांना त्यांच्या कामानुसार हा मोबदला मिळत असतो. यामध्ये दुप्पट वाढ केली जाणार आहे.