
उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱया निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून 476 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळे 2022पर्यंत कालव्यांची कामे जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
उत्तर नगर जिह्यातील 182 गावांमधील सुमारे 68 हजार 800 हेक्टर शेतीला या कालव्यांच्या पाण्यामुळे लाभ होणार आहे. या गावांसाठी अनेक अडचणींतून मार्ग काढत धरणाचे काम पूर्ण झाले. याच काळात कालव्यांची कामेही काही प्रमाणात सुरू केली. कवठे कमळेश्वर, गणेशवाडी, पिंपळगाव कोंझिरा येथील मोठय़ा बोगद्यांची कामेही पूर्ण झाली. मात्र, 2014 ते 2019 या काळात या धरणाच्या कालव्यांची कामे ठप्प झाली. 2019मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच पुन्हा नव्याने या कालव्यांच्या कामांना सुरुवात झाली. प्रथम अकोले तालुक्यातील 0 ते 28 किलोमीटर या कालव्यांच्या कामाला गती देण्यात आली. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे कामाची गती मंदावली. या काळात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कामांना भेट देऊन पुन्हा कामांची गती वाढविली. अकोल्यातील शेतकऱयांच्या विविध अडचणी वेळोवेळी मार्गी लावल्या. या धरणाच्या कालव्यांची कामे 2023पर्यंत पूर्ण करून या भागाला पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी संबंधित विभाग व अधिकाऱयांना राज्य शासनाकडून सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंधारणमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या अर्थसंकल्पात धरणाच्या इतिहासात प्रथमच 476 कोटींची भरीव मदत केली आहे. कोरोनासारखे महाभयंकर संकट असतानाही या अर्थसंकल्पात निळवंडे धरणासाठी भरीव निधी दिला आहे. 31 मार्च 2021पर्यंत 100 कोटी व पुढील आर्थिक वर्षात 376 कोटींची तरतूद केली आहे. तसेच गरज पडल्यास हिवाळी अधिवेशनात पुरवणीत पुन्हा निधी मागता येणार आहे. यामुळे 2022पर्यंत कालव्यांची कामे जलद गतीने मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे 182 गावांमधील लाभधारक शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, 2022 पर्यंत कालव्यांची कामे जलद गतीने होणार असल्याचा विश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला आहे.






























































