भोपाळमध्ये 4 बांगलादेशी दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात राहून दहशतवादी कारवायांसाठी स्लीपर्स सेल तयार करणाऱया चार बांगलादेशी दहशतवाद्यांना मध्य प्रदेश एटीएसने अटक केली. हे चारही दहशतवादी बांगलादेशमध्ये बंदी असलेल्या जमात-ए-मुजाहिद्दीनचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात जिहादचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.

मध्य प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाला काही दहशतवादी भोपाळमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर एटीएसने रविवारी पहाटे साडेतीन वाजता ऐशबाग परिसरात छापा मारला. पोलीस आल्याची माहिती मिळताच दहशतवाद्यांनी आतून दरवाजा लावून घेतला. मात्र पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघा दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे करोद परिसरात छापा मारून आणखी दोन दहशतवाद्यांना अटक केली. फजहर अली (32), मोहम्मद अकील (24), जहूरउद्दीन (28) आणि फजहर जैनुल आबदीन अशी दहशतवाद्यांची नावे आहेत.