
हिंदुस्थानच्या उभारणीत गुजराती समाजाचे महत्त्वाचे योगदान आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई आणि नरेंद्र मोदी या चार गुजरातींनी हिंदुस्थानच्या आधुनिक इतिहासात मोठे योगदान दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानची किर्ती जगभर पसरत आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.
दिल्लीतील गुजराती समाज संस्थेला 125 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना शहा म्हणाले की, देश आज ज्या स्थितीत आहे त्याच श्रेय गुजराती समाजाचे आहे. आधुनिक हिंदुस्थानच्या उभारणीत चार गुजरातींनी दिलेल्या योगदानाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
गुजराती समाज संपूर्ण देशात आणि जगभर आहे. तो सहजपणे लोकांमध्ये मिसळतो आणि त्यांची सेवाही करतो हे या समाजाचे वैशिष्टय़ आहे. दिल्लीत राहणाऱ्या गुजरातींना त्यांच्या संस्कृतीशी आणि सभ्यतेशी जोडून देश आणि समाजाची सेवा करण्याची प्रेरणा देण्याचे काम केले, अशा शब्दांत शहांनी संस्थेचे कौतुक केले.महात्मा गांधींमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, सरदार साहेबांमुळे देश एक झाला, मोरारजी देसाईंमुळे देशाची लोकशाही पुनरुज्जीवित झाली आणि नरेंद्र मोदींमुळे हिंदुस्थानचे नाव जगासमोर आले. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था जगात 11 व्या क्रमांकावर होती आणि आज नऊ वर्षांनंतर हिंदुस्थान ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न
संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देणाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या मोरारजी देसाई यांना लोकशाहीचे उद्धारक संबोधून पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न दिल्लीतील गुजराती समाजासमोर बोलताना केला.





























































