जम्मू कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातून जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या चार दहशतवाद्यांमध्ये एक पोलीस देखील असून तो काही दिवसांपूर्वी दहशतवादी संघटनेत सामिल होण्यासाठी पळून गेला होता.

बडगाम जिल्ह्यातील हायतापौरा भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या भागात पोलिसांनी शोध कारवाई सुरू केली. त्यावेळी चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यातील एक जण अल्ताफ हुसेन हा पोलीस अधिकारी होता. मात्र वर्षभरापूर्वी तो पळून गेला होता. या व्यतिरिक्त अहमद भाट, जमशीद माग्रे, झाहीद दार अशी त्या दहशतवाद्यांची नावं आहेत.

शनिवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-कश्मीर येथील शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता तर इतर दोन दहशतवादी जखमी झाले होते. जम्मू-कश्मीरमध्यील शोपियान या भागांत काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या ठिकाणी शुक्रवारपासून शोधमोहीम सुरू केली होती. ही शोधमोहीम सुरू असतानाच या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यावेळी पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. शनिवारी संध्याकाळपर्यंत पोलिसांची शोधमोहीम सुरू केली होती, अशी माहिती सुरक्षा दलाच्या जवानांकडून देण्यात आली.

गुरुवारी झाली होती मोठी चकमक

शनिवारी झालेल्या पोलीस चकमकीपूर्वी गुरुवारी बारामुल्ला येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. येथील वानीगाम पाईन येथे पोलिसांनी शोधमोहिमेत पोलिसांनी ही कारवाई केली.

गेल्या काही दिवसांपूर्वीची सुरक्षा दलाची कारवाई

  • 13 डिसेंबरला सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू येथील गजनवी फोर्सजवळ दोन दहशतवाद्यांना खात्मा केला होता. यावेळी एका दहशतवाद्यांला अटक केली होती.
  • 17 डिसेंबर रोजी अनंतनाग येथे सुरक्षा दलाच्या जवानांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. यात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी झाला होता.
  • 17 डिसेंबरला अवंतीपोरा येथेदेखील सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.
  • 20 डिसेंबर रोजी अनंतनाग येथे पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात एक सीआरपीएफचा जवान जखमी झाला होता.