
अंथरुणाला खिळलेले रुग्ण, एचआयव्ही रुग्ण, नाईलाजाने देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱया महिला, तृतीयपंथी, बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते, बेघर अशा निरनिराळ्या समाज घटकांना लसीकरणाचा आता लाभ मिळणार आहे. शिवसेना विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांची मागणी मान्य झाली असून महापालिकेने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आणि काल पासून दुर्लक्षित घटकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी मुंबईत 4 फिरती लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी दुर्लक्षित घटकांचे कोविड लसीकरण करण्याची मागणी विधिमंडळाच्या अधिवेशनात शासनातर्फे मांडण्यात आलेल्या ठरावाच्या वेळी बोलताना करून, सरकारचे लक्ष वेधले होते. यावर नियोजन करून लवकरच लसीकरण करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानुसार अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱयांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिका आणि व्हॅक्सिन ऑन व्हिल्स्, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 4 फिरती लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते झेंडा दाखवून काल या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या समाज घटकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रारंभी एकूण 4 फिरती लसीकरण केंद्रे (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक फिरत्या केंद्रामध्ये 1 प्रशिक्षित डॉक्टर, 2 परिचारिका, 2 वैद्यकीय सहाय्यक, रुग्णवाहिका चालक उपलब्ध राहणार आहेत. त्यांना लॅपटॉप आणि वायफाय इंटरनेट सुविधा पुरविली जाणार आहे.






























































