आसाममध्ये ४० लाख घुसखोर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मसुदा जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशाच्या उत्तरपूर्व भागातील बांगलादेश सीमेवरील महत्त्वाचे आणि संवेदनशील राज्य असलेल्या आसाममध्ये तब्बल ४० लाख नागरिक घुसखोर असल्याचा धक्कादायक अहवाल राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) मसुदामध्ये जाहीर करण्यात आला आहे. या ४० लाख लोकांना आसाममधून हाकलले जाऊ शकते. त्यामुळे अनेक जिल्हय़ांमध्ये तणाव निर्माण झाला असून बंदोबस्तात वाढ केली आहे. जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली नॅशन रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीकडून २०१३ पासून मसुदा तयार करण्याचे काम सुरू होते. आज ‘एनआरसी’ने आपला दुसरा आणि अंतिम मसुदा सादर केला. त्यात ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोकांना कायदेशीर नागरिक म्हणून घोषित केले आहे. ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना घुसखोर जाहीर केले आहे. यापूर्वी ‘एनआरसी’ने ३१ डिसेंबर २०१७ ला पहिला मसुदा जाहीर केला होता. त्यात १.९० कोटी लोक कायदेशीर रहिवासी असल्याचे जाहीर केले होते.

घुसखोरांचा प्रश्न; सुप्रीम कोर्टाकडून दखल
आसाममध्ये १९७१ पासून बांगलादेशींची घुसखोरी वाढली. रेशनकार्ड, मतदार कार्ड मिळवून लाखो घुसखोर आसाममध्ये राहत असल्याचा मुद्दा अनेकदा चर्चेला आला. सर्वोच्च न्यायालयाने या घुसखोरीच्या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन तीन वर्षांत ४० वेळा सुनावणी घेतली. डिसेंबर २०१३ पासून राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मसुद्याचे काम सुरू झाले. यावर सुप्रीम कोर्टाची निगराणी होती.

ही यादी अंतिम नाही – राजनाथ सिंह
राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारची भूमिका मांडली. ‘एनआरसी’ ही स्वायत्त संस्था आहे. सुप्रीम कोर्टाच्या निगरानीखाली काम सुरू होते. यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. आज जाहीर झालेली एनआरसीची यादी अंतिम नाही. ज्यांची नावे नाहीत त्यांनी दोन-तीन महिन्यांत पुनहा अपील करावे. सुप्रीम कोर्ट त्यावर निर्णय घेईल. त्यानंतरही हे लोक बेकायदेशीर टरले तर विदशी न्यायाधिकरणाकडे दाद मागावी. कोठे तरी या लोकांना न्याय मिळेल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

भाजपचे मतांचे राजकारण; पश्चिम बंगालला परिणाम भोगवे लागणार – ममता
ज्या ४० लाख लोकांची नावे नाहीत ते कुठे जातील? त्यांचे भवितव्य काय? केंद्र सरकारने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला आहे का? असे सवाल करीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मागे भाजपचे मतांचे राजकारण आहे, असा थेट आरोप केला. याचे परिणाम पश्चिम बंगाललाच भोगावे लागणार, असे त्या म्हणाल्या. ज्यांच्याजवळ आधारकार्ड, पासपोर्ट आहे अशा लोकांची नावेही या यादीत नाहीत. आडनाव पाहून अनेक लोकांचे नाव हटविण्यात आले. बांगला भाषा बोलणाऱया आणि बिहारींना बळजबरीने आसाममधून भाजपला हाकलायचे आहे. देशातील लोकांनाच शरणार्थी बनविले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

एनआरसीच्या मुद्द्यावरून संसदेत वातावरण तापले

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनमध्ये आसाममधील ४० लाख नागरिक सामील नसल्याचा मुद्दा आज संसदेत चांगलाच तापला. आसाममध्ये ४० लाख बिगर हिंदुस्थानी नागरिक अवैधपणे राहत असल्याचे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनच्या अहवालाद्वारे स्पष्ट झाल्यामुळे देशभरात खळबळ उडालेली असताना त्याचे स्वाभाविक पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. राज्यसभेत तर विरोधकांनी इतका गदारोळ केला की सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. लोकसभेतही या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या मुद्द्यावरून राजकारण करू नका, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना लोकसभेत सुनावले.

६.५० कोटी दस्तावेज; ५५ हजार कर्मचारी

आसामचे नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला १४ वेगवेगळी कागदपत्रे जमा करावी लागतील.
सुमारे ३ कोटी ३० लाख लोकांनी ही कागदपत्रे सादर केली. या दस्तावेजांची संख्या ६.५० कोटींवर गेली. ५०० ट्रक्सच्या वजनाइतके या दस्ताऐवजांचे वजन आहे. प्रत्येक कागदपत्रांची छाननी करण्यासाठी ५५ हजार कर्मचारी काम करीत होते.