मुंबईत होणार 400 कोटींचे नवे रस्ते, रखडलेल्या कामांना शिवसेनेमुळे वेग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी स्थायी समितीत आज सुमारे 400 कोटींच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. पूर्व आणि पश्चिम उपनगरात तातडीने या कामांना सुरुवात होणार आहे. दरम्यान, या कामांचे काही प्रस्ताव अचानक आणल्याचे सांगत भाजपने स्थायी समितीमधून सभात्याग केला. मात्र भाजपची ही भूमिका म्हणजे नाहकचे राजकारण आणि मुंबईच्या विकासकामांत खोडा घालण्याचा प्रकार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

मुंबईत पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे होण्यासाठी ऑक्टोबरपासून कामे सुरू होणे गरजेचे असते. मात्र गेल्या एकाच वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आल्यामुळे प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यास, प्रस्ताव आणण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे हे प्रस्ताव तातडीने मंजूर करून काम सुरू होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने सुमारे 370 कोटींचे प्रस्ताव आज स्थायी समितीत मांडले. मात्र यातील पश्चिम उपनगराचे पाच प्रस्ताव वगळता पूर्व आणि पश्चिम उपनगराचे दहा रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव आपल्याला तीन दिवस आधी मिळाले नसल्याचे सांगत भाजपच्या सदस्यांनी हे प्रस्ताव तातडीने मंजूर करू नये अशी भूमिका मांडली. मात्र मुंबईतील रस्त्यांच्या कामांना आधीच उशीर झाल्यामुळे हे प्रस्ताव तातडीने मंजूर करून काम सुरू होणे गरजेचे असल्याची भूमिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडली. याला भाजप वगळता सर्व पक्षांनी जोरदार पाठिंबा दिला. त्यामुळे मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगराचे एकूण 15 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मात्र यावेळी भाजपने सभात्याग केला.

कामाच्या वेगासाठी 80ः20 फॉर्म्युला
रस्त्यांची कामे झाल्यानंतर निर्धारित हमी कालावधीत देखभाल करण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदारावर असते. मात्र अनेक वेळा काम झाल्यानंतर कंत्राटदार रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाल्यास प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यावर्षीपासून ‘60ः40’ फॉर्म्युल्यानुसार कंत्राटदाराची 40 टक्के रक्कम हमी कालावधीत रोखून ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र यावर्षी कामांना आधीच उशीर झाल्यामुळे आणि रस्त्यांची कामे वेगाने होण्यासाठी काही कामे ‘80ः20’ या जुन्या फॉर्म्युल्यानुसार करण्याबाबत पालिका विचार करीत आहे. यामध्ये हमी कालावधीत 20 टक्के रक्कम पालिका राखून ठेवणार आहे.

पश्चिम उपनगरात असे होणार काम
आर/मध्य – 40 कोटी 38 लाख 77 हजार 961 रुपये
पी-दक्षिण – 20 कोटी 05 लाख 42 हजार 607 रुपये खर्च.
आर-दक्षिण – 4 कोटी 98 लाख 32 हजार 417 रुपये खर्च.
पी-उत्तर – 46 कोटी 81 लाग 60 हजार 554 रुपये खर्च.
आर/मध्य – 5 कोटी 80 लाख 60 हजार 502 रुपये खर्च
पी/उत्तर – 32 कोटी 53 लाख 65 हजार 654 रुपये
आर/मध्य – 7 कोटी 25 लाख 68 हजार 185 रुपये
आर उत्तर – 3 कोटी 78 लाख 99 हजार 141 रुपये
के/पूर्व – 12 कोटी 20 लाख 34 हजार 301 रुपये
पी/उत्तर – 28 कोटी 93 लाख 2 हजार 215 रुपये
के पश्चिम – 16 कोटी 29 लाख 45 हजार 212 रुपये
के पश्चिम – 28 कोटी 16 लाख 7 हजार 458 रुपये

पूर्व उपनगरात होणारे काम
एम पूर्व – 46 कोटी 74 लाख 70 हजार 269 रुपये
एस वॉर्ड – 33 कोटी 69 लाख 40 हजार 421 रुपये
एल वॉर्ड – 40 कोटी 70 लाख 66 हजार 216 रुपये