
साहित्य हे विकासाचे अंग असल्याने सरकारने संतपीठाचा प्रश्न मार्गी लावला आहे. मराठीला मदत केलीच पाहिजे. मात्र, हे करत असताना मोबाईलच्या जमान्यात वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी अपेक्षा राज्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. मसापच्या 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.
बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष कादंबरीकार बाबू बिरादार, राधाबाई बिरादार, मावळते अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, आमदार सतीश चव्हाण, मधुकरराव मुळे, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकरव ठाले, किरण सगर, डॉ. दादा गोरे, कुंडलिक अतकरे, स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. चेतना सोनकांबळे आदी उपस्थित होते.
अशोक चव्हाण म्हणाले की, मी साहित्यावर अधिकारवाणीने बोलणार नाही. पण या ठिकाणी साहित्य संमेलन आणि अनुशेषाचा विषय, साहित्य, नाट्य, लिखाणाच्या बाबतीत अनुशेष अजिबात नाही हे ठामपणे सांगतो. हा जिल्हा 5 टक्के असल्याने येथे थोडी सूट आहे. दीड वर्षानंतर चांगली सुरुवात झाली आहे. ठाले पाटील अध्यक्ष होऊन 20 वर्षे उत्तम काम करत आहेत. साहित्य संमेलन घेणे अवघड आहे पण आज येथे चांगलं संमेलन होत आहे. साहित्य हे विकासाचे अंग असल्याने सरकारने मदत केलीच पाहिजे. राजाश्रय आवश्यक आहे. आपण चिंता करू नका मदत केली जाईल. आपण प्रमुख असताना सांस्कृतिक धोरणाला आकार दिला होता. त्याला अधिक गती देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत सकारात्मक भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.
संमेलनात अत्यंत चांगले मुद्दे विषय चर्चेसाठी घेतले आहेत. आयटी तंत्रज्ञानाचा फायदा आपण घेतो. मात्र, साहित्यिकांचे लेखन आमचे खरे गुगल आहे. आमच्या साहित्यिकांचे लिखाण गुगलपेक्षाही मोठे आहे असे मला वाटते. मनपानेदेखील साहित्य परिषदेचे कार्यालय सुरू करण्याचा ठराव घेतला आहे. हे काम 6 महिन्यात मार्गी लावले जाईल. मराठी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी समिती स्थापन केली आहे. संतपीठावर 8 वर्षे चर्चा होत आहे. पण मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले आणि संतपीठाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याठिकाणी चांगले काम करणारे लोक असले पाहिजेत. मोबाइलच्या जमान्यात वाचनसंस्कृती वाढली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संतांचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य हे मराठवाड्याचे वैभव – बिरादार
संमेलनाचे अध्यक्ष बाबू बिरादार म्हणाले की, संतांची भूमी हीच मराठवाड्याची ओळख, संतांचे सामाजिक आणि वाङ्मयीन कार्य मराठवाड्याचे सांस्कृतिक वैभव आहे. माणूस एकदा साहित्याचा केंद्र झाला की, लेखकाला त्याच्या सुखदुःखाचे, हर्षखेदाचे, कार्यकारणभाव शोधावे लागतात. त्यांच्या वाढीला… विकासाला… प्रतिबंध करणाऱ्या जसा धिक्कार करावा लागतो तसा त्यांच्या वाढीला अनुकूल असणाऱ्या बाबींना बळ द्यावं लागतं. अर्थात हे सर्व कलात्मक पातळी सांभाळून! म्हणून लेखकाला माणसाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी येतात. त्याचा विचार, अभ्यास, व्यासंग, मनन, चिंतन, आवश्यकच नाही तर अपरिहार्य आहे. त्यात माणसाचे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही सनातन दुःखे जशी आहेत. तसेच माणसाच्या जगण्यासाठी अन्न, पाणी, निवारा, वस्त्रप्रावरणे आहेत याचाही विचार लेखकाठायी पाहिजे.
याअनुषंगाने समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकशाख, अध्यात्मशास्त्र, नैतिकशास्त्र इत्यादी आणि हा माणूस ज्या समाजात राहातो त्या समाजाला नियमन करणारी राजसत्ता या सर्वांचे स्थूलमानाने का होईना लेखकाला ज्ञान पाहिजे, तरच तो शोधीत असणारा माणूस त्याच्यापुढे उभा राहील. लेखकाचा धर्म एकच. जीवनदर्शन घडविणे. स्वतःला आलेल्या अनुभवाचा प्रत्यय वाचकाला आणून देणे. त्याची आंतरिक ईर्ष्या एकच स्वतःच्या ज्या अनुभवाच्या दर्शनाने तो रोमांचित झाला तोच रोमांच वाचकाच्या अंगावर पाहणे.
एवढा अट्टाहास लेखक का करतोय? माझ्या मते, लेखकाला खात्री असते. आपल्याला आलेला जीवनाचा हा अनुभव अनपेक्षित आणि अपूर्व आहे. अलौकिक आणि अनन्यसाधारण आहे. ह्या निमिषार्धात झालेले जीवनदर्शन अद्वितीय आहे आणि हा मांडणीचा, रचनेचा क्षण हुकला तर संपूर्ण मानवजातीला हे जीवनदर्शन दुर्लभ, अलभ्य आहे. म्हणून लेखक आपली संपूर्ण क्षमता पणाला लावतो आणि तो जीवनअनुभव निखळपणे उभा करतो. सत्यावरचे आवरण त्या क्षणापुरते निखळून पडते. महात्मा गांधीचे वैचारिक गुरू हेन्री डेव्हीड थोरो यांचं एक वचन उद्धृत करतो, या जगात दोनच अशी स्थळे आहे की, ज्यांच्यावर आपला माथा टेकवावा. एक भरड माळाला वहीत करून धान्य पिकविणारा शेतकरी. दुसरा समाजधारणा करणारा विचारवंत साहित्यिक!
कितीही मोठी रणभूमी असू द्या. कितीही युद्धसूचक रणभेरी, रणशिंग, शंख, तुताऱ्या वाजू द्या. कितीही अक्षोणी सैन्य शस्त्रास्त्रांनी सज्ज असू द्या. पण जोपर्यंत महर्षी व्यासकृत श्रीकृष्ण रणभूमीवर आहे. तोपर्यंत मानवप्रजातीला संहार नाही आणि त्या भगवंत वाणीला पर्याय नाही आणि आम्ही तुम्ही तर त्या महर्षी व्यासांचे वारसदार आहोत असे ते म्हणाले. यावेळी बोलताना अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, मराठी भाषिकांची 654 वर्षे गळचेपी होत होती.त्यामुळे हा समूह दुर्देवी आहे. असे असले तरी या माणसांनी भाषेची साथ सोडली नाही. त्यातून मराठवाडा साहित्य परिषदेसारख्या संस्थांची निर्मिती झाली. त्यातून पाहिले मराठी साहित्य संमेलन झाले. मसापची स्थापना नांदेडमध्ये 74 वर्षांपूर्वी झाली. मराठीचा जन्म याच मराठवाड्याच्या मातीत झाला. पहिला लेखक, पहिला कवी सर्व सर्व मराठवाड्यात असेल तर मराठी ही मराठवाड्याचीच. काहींनी खोडसाळपणे विदर्भात नेली. नंतर आद्यकवी मुकुंदराज यांची अंबानगरी शोधली गेली आणि त्यातून एकेक धागा मराठवाड्याच्या पदराशी जोडला गेला आहे. मसाप ही जागृत संस्था असून तिला कार्यालये नाहीत. धाराशिवला आता कार्यालय होत आहे. नांदेडला कार्यालय देण्याचे आश्वासन अशोकरावांनी दिले होते. पण अजून मिळाले नाही. आता ते कार्यालय लवकरच होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संमेलनाचे चांगले आयोजन केल्याबद्दल लोकसंवाद फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी संमेलन कसे उभे राहिले याची माहिती दिली. ते म्हणाले, मराठवाड्यात प्रचितन काळात संतसंमेलने झाल्याचा इतिहास आहे. अंबाजोगाईच्या वातावरणातून वाचनाची सवय जडली. त्यातून लोकसंवाद उपक्रम सुरू केला. या व्यासपीठावर मोठ्या माणसांनी चर्चेत सहभागी होऊन मार्गदर्शन केले. कोरोनाच्या अडचणीमुळे संमेलन देगलूर येथे होऊ शकले नाही. ते आम्हाला घेण्याचे भाग्य लाभले. प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ. राम चव्हाण यांनी संमेलन उभे करण्यामागची भूमिका आणि त्यासाठी विविध स्तरांतून झालेल्या लोकसहभागाचा आढावा घेतला.































































